भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने बुधवारी (९ मार्च) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २०११ विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ज्या ११ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व कले, त्यापैकी १० खेळाडूंनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशात आगामी २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषकात एक भारतीय खेळाडू असा आहे, ज्याने २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.
एस श्रीसंत २०१३ आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला आणि त्यानंतर पुढच्या ७ वर्षांसाठी त्याच्यावर बंदी घातली गेली होती. सात वर्षांनंतर न्यायालय आणि बीसीसीआयने त्याला क्लीन चिट दिली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, पण अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. तसेच आयपीएल २०२१ आणि २०२२ च्या लिलावासाठीही त्याने स्वतःचे नाव नोंदवले होते. त्यापैकी एकदा बीसीसीआयने त्याचे नाव काढून टाकले, तर २०२२ हंगामात कोणीच त्याला खरेदी करण्याची इच्छा दाखवली नाही.
जर आपण २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या प्लेइंग इलेव्हनचा विचार केला, तर त्यापैकी १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, एमएस धोनी, युवराज सिंग, हरभजन सिंग, जहीर खान, मुनाफ पटेल आणि एस श्रीसंत यांचा समावेश होता. विराट कोहली एकमेव खेळाडू आहे, जो अजूनही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि आगामी विश्वचषकही खेळणार आहे. दरम्यान, त्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेल्या ११ खेळाडूंपैकी विराट सोडून जे १० खेळाडू होते, त्यांनी विराटच्या आधी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते आणि आधीच निवृत्तीही घेतली.
विराट कोहलीचे वय सध्या ३३ वर्ष आहे आणि त्याची फिटनेस पाहता, तो २०२७ चा विश्वचषक खेळेल अशी अपेक्षा आपण त्याच्याकडून ठेऊ शकतो. जर त्याने २०२७ विश्वचषक खेळला, तर तो भारतासाठी पाच विश्वचषक खेळणारा खेळाडू बनेल. त्याने २०११, २०१५ आणि २०१९ विश्वचषक खेळला आहे. आगामी विश्वचषक २०२३ मध्ये खेळला जाणार आहे, ज्यामध्ये विराटची भूमिका महत्वाची असेल.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना
आयपीएल इतिहासात प्रथमच असणार ऑरेंज कॅप-पर्पल कॅपसाठी स्पॉन्सर! ‘या’ कंपनीशी झाला करार
अखेर दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचे पार्थिव मेलबर्नमध्ये दाखल, मार्चअंती होणार अनंतात विलिन