वनडे क्रिकेट सुरु होऊन आता जवळजवळ ५० वर्षे होतील. पहिला वनडे सामना १९७१ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात मेलबर्न क्रिकेट मैदानात खेळवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटपेक्षा थोड्या वेगाने खेळल्या जाणाऱ्या आणि एकाच दिवसात संपणाऱ्या या क्रिकेट प्रकाराला लवकरच क्रिकेट चाहत्यांनी आपलसं केले.
आत्तापर्यंत वनडेमध्ये २६११ खेळाडू किमान एकतरी सामना खेळले आहेत. यातील किमान २० डाव खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीे असलेल्या १० फलंदाजांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेले फलंदाज (किमान २० डाव खेळलेले) –
१०. एमएस धोनी – भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये १० व्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत ३५० वनडे सामन्यांमध्ये २९७ डावात खेळले आहेत. यामध्ये त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतके केली आहेत. तसेच तो ८४ वेळा नाबाद राहिला आहे.
९. जो रुट – इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत १४६ वनडे सामने खेळले आहेत. यातील १३७ डावात फलंदाजी करताना ५१.०५ च्या सरासरीने ५९२२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १६ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहे. यामध्ये तो २१ वेळा नाबाद राहिला आहे.
८. जोनाथन ट्रॉट – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ट्रॉट या यादीत ८ व्या क्रमांकावर आहे. त्याने २००९ ते २०१३ च्या दरम्यान ६८ सामन्यात खेळला. यात त्याने ५१.२५ च्या सरासरीने २८१९ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके २२ अर्धशतके त्याने केली असून तो १० वेळा नाबाद राहिला आहे.
७. शाय होप – वेस्ट इंडिजचा युवा फलंदाज शाय होप वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये ७ व्या क्रमांकावर असून त्याने आत्तापर्यंत ७८ सामने खेळले आहेत. यातील ७३ डावात ५२.२० च्या सरासरीने ३२८९ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतके आणि १७ अर्धशतके केली असून १० वेळा तो नाबाद राहिला आहे.
६. एबी डिविलियर्स – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने आत्तापर्यंत अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो वनडेत सर्वात जलद शतक करणाराही क्रिकेटपटू आहे. मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिविलियर्सने २०१८ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्याने त्याच्या कारकिर्दीत २२८ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने २१८ डावात फलंदाजी केली असून २५ शतके आणि ५३ अर्धशतकांसह त्याने ५३.५० च्या सरासरीने त्याने ९५७७ धावा केल्या आहेत. तसेच तो वनडेमध्ये ३९ वेळा नाबाद राहिला आहे.
५. मायकल बेवन – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मायकल बेवनने अनेकदा आक्रमक खेळी केल्या आहेत. त्याने १९९४ ते २००४ या १० वर्षात २३२ वनडे सामने खेळले. यामध्ये तो ६७ वेळा नाबाद राहिला आहे. तसेच वनडेत त्याने १९६ डावात ५३.५८ च्या सरासरीने ६ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ६९१२ धावा केल्या आहेत.
४. इमाम उल हक – २४ वर्षीय इमाम उल हक वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१७ मध्ये पाकिस्तानकडून वनडेत पदार्पण केले असून तो आत्तापर्यंत ३७ वनडे सामने खेळला आहे. यात त्याने ५३.८४ च्या सरासरीने १७२३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ७ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत. तो आत्तापर्यंत ५ वेळा नाबाद राहिला आहे.
३.बाबर आझम – पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. २५ वर्षीय बाबर आझमने २०१५ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत ७४ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ५४.१७ च्या सरासरीने ३३५९ धावा केल्या आहेत. त्याने शतके आणि अर्धशतके केली आहेत. तसेच तो आत्तापर्यंत १० वेळा नाबाद राहिला आहे.
२. विराट कोहली – भारताचा कर्णधार विराट कोहली वनडेमध्ये सर्वाधिक सरासरी असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. रनमशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराटने २००८ ला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून त्याने आत्तापर्यंत २४८ वनडे सामने खेळले आहेत.
यातील २३९ डावात फलंदाजी करताना ५९.३३ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४३ शतकांचा आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो ३९ वेळा नाबाद राहिला आहे.
१. रायन टेन डोशॅकेट – नेदरलँड्सकडून खेळलेल्या रायन टेन डोशॅकेटने २००६ ते २०११ दरम्यान वनडे सामने खेळले आहेत. त्याने ३३ वनडे सामन्यात ६७ च्या सरासरीने १५४१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो ९ वेळा नाबाद राहिला आहे. तो वनडेत सर्वाधिक सरासरी असणारा फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख –
टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !