fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

षटकार ठोकत शतक पूर्ण केलेल्या हिटमॅन रोहित शर्माने केलाय हा खास विक्रम

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे भारत-दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसाचा व्यत्यय आल्याने 58 षटकांनंतर थांबवण्यात आला आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 3 बाद 224 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे त्याने 45 व्या षटकात डेन पायटेडने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले.

रोहितची कसोटीमध्ये षटकार ठोकत शतक पूर्ण करण्याची ही दुसरीच वेळ आहे. त्यामुळे षटकार मारत सर्वाधिक वेळा कसोटी शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गौतम गंभीरची बरोबरी केली आहे. गंभीरनेही 2 वेळा कसोटीमध्ये षटकार ठोकत शतक पूर्ण केले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे. सचिनने 6 वेळा षटकार ठोकत कसोटीमध्ये शतक पूर्ण केले आहे.

रोहितने सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत पहिल्या दिवसाखेर 164 चेंडूत नाबाद 117 धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले.  रोहितबरोबर अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक पूर्ण करताना 135 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

तत्पूर्वी भारताने पहिल्या 3 विकेट्स 16 षटकांच्या आतच गमावल्या होत्या. यामध्ये मयंक अगरवाल(10), चेतेश्वर पुजारा(0) आणि विराट कोहलीच्या(12) विकेट्सचा समावेश होता. पण या विकेट्सनंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी नाबाद 185 धावांची भागीदारी केली आहे.

सर्वाधिकवेळा षटकार ठोकत कसोटी शतक पूर्ण करणारे भारतीय क्रिकेटपटू –

6 वेळा – सचिन तेंडूलकर

2 वेळा – रोहित शर्मा

2 वेळा – गौतम गंभीर

You might also like