कसोटी हा क्रिकेटचा प्राण आहे. या फॉरमॅटमधूनच क्रिकेटसारख्या अप्रतिम खेळाची सुरुवात झाली. कधीकाळी या फॉरमॅटमध्ये फलंदाज चेंडूचा बचाव करायचे. परंतू, आता ते षटकार मारायला चुकत नाहीत. आम्ही तुम्हाला अशा 5 गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना कधीही षटकार खाल्ला नाही. ज्यांनी आपल्या कारकिर्दीत फलंदाजांना षटकार मारण्यासाठी तरसवले.
मुदस्सर नजर- मुदस्सर नजर (Mudassar Nazar) हा पाकिस्तानचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. तो सलामीवीर आणि वेगवान गोलंदाज होता. 1976 ते 1989 या काळात त्यानं पाकिस्तानसाठी 76 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 5,967 चेंडू टाकले आणि 66 विकेट्स घेतल्या. पण त्यानं कधीही फलंदाजांना षटकार मारुन दिला नाही.
महमूद हुसेन- महमूद हुसेन (Mahmood Hussain) हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता. त्यानं 1952 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. हुसेननं पाकिस्तानसाठी 27 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 68 विकेट्स घेतल्या. हुसेननं आपल्या कसोटी कारकिर्दीत 5,910 चेंडू टाकले. परंतू आपल्या कसोटी कारकीर्दीमध्ये त्यानं फलंदाजांना एकही षटकार मारु दिला नाही.
कीथ मिलर- या यादीत ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू कीथ मिलरचाही (Keith Miller) समावेश आहे. 1946 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मिलरने आपल्या कारकिर्दीत 55 कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 170 विकेट्स घेतल्या. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने 10,461 चेंडू टाकले पण फलंदाजांना एकही षटकार मारु दिला नाही.
नील हॉक- ऑस्ट्रेलियन गोलंदाज नील हॉकने (Neil Hawke) 1963 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत 27 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याच्या नावावर 91 विकेट्स आहेत. हाॅकने आपल्या कारकिर्दीत 6,987 चेंडू टाकले. परंतू कोणत्याही फलंदाजाला त्यानं षटकार मारु दिला नाही.
डेरेक प्रिंगल- या यादीत इंग्लंडचा माजी गोलंदाज डेरेक प्रिंगल (Derek Pringle) सुद्धा आहे. ज्याने 30 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 70 विकेट्स घेतल्या. प्रिंगलने 5 हजारांहून अधिक चेंडूही टाकले परंतू एकही फलंदाज त्याच्या चेंडूवर षटकार मारु शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकला डावलून सूर्यकुमारला टी20 संघाचा कर्णधार का बनवायला पाहिजे? ‘ही’ आहेत 3 प्रमुख कारणे
अमित मिश्राच नाही तर या क्रिकेटपटूंनीही केली आहे वयात गडबड, एकानं यावर्षीच जिंकला आयपीएल खिताब
गंभीर आणि बीसीसीआयची आवडनिवड जुळेना! नव्या प्रशिक्षकाने स्टाफसाठी सुचवलेली 5 नावं बोर्डाकडून नामंजूर