15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी मोठा उत्सव आहे. या दिवशी भारताने 150 पेक्षा जास्त वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. यासाठी असंख्य बलिदान दिले गेले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर हा दिवस दरवर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. भारतीय क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर स्वातंत्र्यानंतर भारताने 15 ऑगस्ट या दिनी अवघे चार कसोटी सामने खेळले आहेत. आज, त्याच चार सामन्यांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) इंग्लंड विरुद्ध भारत, 14-18 ऑगस्ट 1952
1952 चा इंग्लंड दौरा भारतीयांसाठी एका वाईट स्वप्नासारखा होता. पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करल्याने भारताने आधीच मालिका गमावली होती. 14-18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या ओव्हलवरील चौथ्या कसोटीत डेविड शेफर्ड यांच्या शतकाने व कर्णधार लेन हटन यांच्या 86 धावांच्या मदतीने इंग्लंडने 326 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, भारताची अवस्था 49-5 अशी असताना पाऊस सुरु झाला. त्यानंतर सलग अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर भारताचा डाव 98 धावांवर संपला. पावसामुळे खेळ वाया गेल्याने सामना अनिर्णित राहिला.
2) भारत विरुद्ध श्रीलंका, 14-17 ऑगस्ट 2001
2001 श्रीलंका दौऱ्यावर 14-17 ऑगस्ट दरम्यान झालेल्या गालेमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेच्या अतिशय मजबूत संघाने भारताला चारीमुंड्या चित केले होते. पहिल्या डावात युवा दिलहारा फर्नांडोने भारतीय फलंदाजीची वाताहात केली. फर्नांडोने पाच बळी घेत भारताचा डाव 187 वर रोखला. कुमार संगकारा आणि सनथ जयसूर्या यांनी शतके ठोकत श्रीलंकेला 362 पर्यंत मजल मारून दिली. दुसर्या डावात पुन्हा एकदा भारतीय डावाची घसरण झाली. भारतीय संघाला केवळ 180 धावा करता आल्या. यजमान संघाने विजयासाठी मिळालेले 6 धावांचे लक्ष्य एकाच षटकात, चौथ्या दिवशी पूर्ण केले.
3) भारत विरुद्ध इंग्लंड, 15-17 ऑगस्ट 2014
स्वातंत्र्यदिनी सर्वात खराब प्रदर्शन भारताने 2014 च्या इंग्लंड दौऱ्यावर केले. ओव्हलच्या मैदानावर, मालिकेतील पाचव्या कसोटीच्या, पहिल्या डावात भारत 148 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एमएस धोनीने सर्वाधिक 82 धावा केल्या. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात जो रूटच्या नाबाद 149 धावांच्या बळावर 486 धावांचा डोंगर उभारला. ख्रिस जॉर्डनच्या 4 बळी मुळे भारताचा डाव अवघ्या 94 धावात संपुष्टात आला. भारताने त्या सामन्यात, अवघ्या अडीच दिवसात, एक डाव व 244 धावांनी पराभव स्वीकारला.
4) भारत विरुद्ध इंग्लंड, 12-16 ऑगस्ट 2021
वर्ष 2021मध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनी लॉर्ड्स येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यातील चिवट शतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याच्या पहिल्या डावातील 129धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 364 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात जो रूटच्या नाबाद 180 धावांमुळे इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 27 धावांची आघाडी घेतली होती.
मात्र चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमी यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. तसेच मोहम्मद सिराज (04 विकेट्स), जसप्रीत बुमराह (03 विकेट्स) आणि इशांत शर्मा (02 विकेट्स) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने तो सामना 151 धावांनी जिंकला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एका सुवर्ण युगाचा अंत! ‘बिग बुल’च्या निधनाने हळहळले भारतीय दिग्गज
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत
बाबो.. बॅट आहे की धावा काढायची मशीन! इंग्लंडचा क्रिकेटर जबरदस्त फॉर्मात, शतकांची केलीय हॅट्रिक






