भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यात आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. भारताने या दौऱ्यात बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. यात वनडेत भारताला 2-1ने पराभवाचा धक्का बसला. मात्र, कसोटीत भारताने दमदार पुनरागमन करत यजमानांना 2-0ने धूळ चारली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयात आर अश्विन याने सिंहाचा वाटा उचलला. यासोबतच तो यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतही सामील झाला. यामध्ये त्याने विराट कोहली आणि केएल राहुल यांनाही मागे सोडले.
अश्विनचा विक्रम
बांगलादेश विरुद्ध भारत (Bangladesh vs India) संघातील दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने दुसरा डाव संपल्यानंतर भारतापुढे 145 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारतीय संघाला संघर्ष करावा लागला. मात्र, आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शेवटपर्यंत नाबाद राहून किल्ला लढवत भारताला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. या दरम्यान अश्विनने 42 आणि श्रेयसने 29 धावांचे योगदान दिले. अश्विनने 42 धावा ठोकत 2022मध्ये कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले.
Ravichandran Ashwin and Shreyas Iyer's unbeaten 71-run stand take India over the line ✌️#WTC23 | #BANvIND | 📝 https://t.co/ZTCALEDTqb pic.twitter.com/aSdztm13zO
— ICC (@ICC) December 25, 2022
अश्विनने यावर्षी 6 कसोटी सामन्यातील 10 डावात खेळताना 30च्या सरासरीने 270 धावांचा डोंगर उभा केला. यातील 61 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. तसेच, त्याने यादरम्यान 2 अर्धशतकेही झळकावली.
यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत हा अव्वलस्थानी आहे. त्याने 7 सामन्यातील 12 डावात 680 धावा केल्या आहेत. तसेच, दुसऱ्या स्थानी श्रेयस अय्यर असून त्याने 5 सामन्यातील 8 डावात 422 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी चेतेश्वर पुजारा असून त्याने 5 सामन्यातील 10 डावात 409 धावा चोपल्या आहेत. यादीत चौथ्या स्थानी रवींद्र जडेजा असून त्याने 3 सामन्यातील 5 डावात 328 धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त सहाव्या स्थानी विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 6 सामन्यातील 11 डावात 270 धावा केल्या आहेत. सातव्या स्थानी हनुमा विहारी असून त्याने 4 सामन्यातील 7 डावात 215 धावा केल्या आहेत. तसेच, आठव्या स्थानी असलेल्या शुबमन गिल याने 3 सामन्यातील 6 डावात 178 धावा केल्या आहेत. नवव्या स्थानी असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याने 4 सामन्यातील 8 डावात 137 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे अश्विनने विराट आणि राहुलला यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पछाडले आहे.
सन 2022मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
680 धावा- रिषभ पंत
422 धावा- श्रेयस अय्यर
409 धावा- चेतेश्वर पुजारा
328 धावा- रवींद्र जडेजा
270 धावा- आर अश्विन
265 धावा- विराट कोहली
215 धावा- हनुमा विहारी
178 धावा- शुबमन गिल
137 धावा- केएल राहुल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-श्रेयसच्या भन्नाट खेळीने भारताचा दुसऱ्या कसोटीत रोमांचक विजय, मालिकाही घातली खिशात
तेव्हा सचिन-द्रविड आणि सेहवागही 100 धावा करू शकले नाहीत, आज बांगलादेशविरुद्ध भारताचे काय होणार?