भारत आणि इंग्लंड संघामध्ये ४ ऑगस्ट पासून कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना नॉटिंगघममध्ये खेळला जाईल. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या मालिकेबद्दल विविध विषयांवर मतं व्यक्त केली आहेत.
लीचने म्हटले आहे की भारताविरुद्धच्या मालिकेतून इंग्लंडच्या संघाचा स्तर किती आहे, हे समजेल. तसेच आगामी मालिकेत वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. भारताने यापूर्वी २०१८ साली इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताला १-४ ने पराभव पत्करावा लागला होता. तसेच यावर्षाच्या सुरुवातीला भारताने मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा हे दोन संघ आमने-सामने येतील.
जॅक लीचने फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर खेळलेल्या ४ सामन्यांच्या मालिकेत १८ विकेट्स घेतल्या होत्या. लीच म्हणाला की, भारतातील त्याच्या यशामुळे त्याला एक आत्मविश्वास आला आहे. नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिजवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या आगामी मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा त्याने विश्वास व्यक्त केला आहे. जॅक लीचने द गार्डियनला सांगितले, ‘माझा विश्वास आहे की मी भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करू शकतो.’
लीच म्हणाला की, ‘जर खेळपट्टी चांगली असेल, तर ते फक्त तुमच्या कौशल्याच्या बाबतीत थोडे जुळवून घेण्याची गरज असते. मला इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजी करायला मिळणार आहे, याचा मला आनंद आहे. खेळपट्टी सहसा या काळात खूप कोरडे असते आणि अर्थातच यात फिरकीपटू महत्वाची भूमिका बजावतील. ‘
तो म्हणाला की ‘भारतासारख्या मजबून संघाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळून आम्हाला आमचा स्तर काय आहे, हे कळेल.’
जॅक लीच या मालिकेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. त्याच्या या कामगिरीमुळे तो ऍशेस मालिकेसाठी संघात आपले स्थान पक्के करू शकेल. तो म्हणाला की, ‘मला वाटते की मी अजूनही नियमितपणे चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मला ही खात्री करुन घ्यायची आहे की माझा खेळ अजून ही चांगला आहे. जेणेकरून मी सातत्याने चांगली कामगिरी करू शकेन आणि संघात माझे स्थान नियमितपणे टिकवून ठेवू शकेल.’
इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ ऑगस्टपासून सुरु होणारी कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय
सिंधूने रचला इतिहास! टोकियोत ‘कांस्य’ जिंकत दोन ऑलिंपिक पदकं मिळणारी बनली भारताची दुसरीच खेळाडू