अमेरिकेमध्ये मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला गुरुवारपासून (दि. 13 जुलै) सुरुवात झाली. हंगामातील पहिला सामना डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडिअम येथे टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना सुपर किंग्स संघाने नाईट रायडर्सला 69 धावांनी पराभूत करत हंगामात विजयी सुरुवात केली. या विजयाचा शिल्पकार विस्फोटक फलंदाज डेविड मिलर ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. यावेळी टेक्सास सुपर किंग्स (Texas Super Kings) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्स संघ 14 षटकात सर्व विकेट्स गमावत 112 धावाच करू शकला.
The first ever #MajorLeagueCricket game has come to a close. @TexasSuperKings dominate, winning by a whopping 69 runs. 🏏 🦁 pic.twitter.com/0zI0DUoPCc
— Major League Cricket (@MLCricket) July 14, 2023
यावेळी नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना आंद्रे रसेल (Andre Russell) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 55 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 7 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त फक्त यष्टीरक्षक फलंदाज जसकरण मल्होत्रा याने 22 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. संघाचे तीन फलंदाज शून्यावर तंबूत परतले, तर कर्णधार सुनील नारायण (Sunil Narine) फक्त 15 धावांचे योगदान देऊ शकला.
यावेळी सुपर किंग्सकडून गोलंदाजी करताना मोहम्मद मोहसिन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 3 षटकात 8 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रस्टी थेरॉन आणि जेराल्ड कॉटझी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कॅल्विन सॅवेज आणि ड्वेन ब्रावो यांनीही प्रत्येकी 1 विकेटवर नाव कोरले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्स संघाकडून डेविड मिलर (David Miller) चमकला. त्याने या सामन्यात 42 चेंडूत 61 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर डेवॉन कॉनवे याने अर्धशतक झळकावले. तो पहिल्याच हंगामात अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला. त्याने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 55 धावांचे योगदान दिले. तसेच, मिचेल सँटनरने 21, लाहिरू मिलांथाने 17 आणि ड्वेन ब्रावो याने 6 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16 धावांचे योगदान दिले. या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस शून्यावर बाद झाला. मात्र, त्याच्या संघ सहकाऱ्यांनी शानदार कामगिरी करत समाधानकारक धावसंख्या उभारली होती.
यावेळी नाईट रायडर्सकडून गोलंदाजी करताना अली खान आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सुनील नारायण आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (Texas Super Kings won by 69 runs in mlc devon conway half century)
महत्वाच्या बातम्या-
‘भें***’, शतकवीर जयसवालकडून पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजच्या खेळाडूला शिवीगाळ, व्हिडिओ लगेच पाहा
परदेशात खेळताना रोहितचा नाद करायचा नाय! 10वे कसोटी शतक ठोकत गावसकरांचा विक्रमही काढला मोडीत