पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने अचूक पसंतीचे टायर कारला नसूनही थायलंड प्री रॅली मालिकेतील पहिल्या फेरीत एकूण क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला. रविवारी ही रॅली पार पडली.
संजयने इसुझू डीमॅक्स युटीलीटी चालविली. इसुझु डेलो स्पोर्टस संघाचा थान्याफात मिनील त्याचा नॅव्हीगेटर होता. थायलंड-कंबोडिया सीमेलगतच्या नाखॉन रत्चासीमा प्रांतातील हुआय बाँग शहरात रॅली झाली. संजयच्या संघाने चिखलमय मार्गासाठी वापरली जाणारी कठिण टायर बसविली होती, प्रत्यक्षात मार्ग मऊ वाळूचा होता. अशावेळी संजयने कौशल्य पणास लावत कार नियंत्रीत केली. त्यामुळे तो फोर-बाय-फोर खुल्या गटात हे यश मिळवू शकला.
संजयने सांगितले की, सुरवातीला आम्हाला टायर अचूक प्रकारचे नसण्याचा फटका बसला. आमच्या कारला ग्रीप मिळत नव्हती. टोयोटाच्या 35 क्रमांकाच्या कारची टायर अचूक होती. त्यातच माझ्यापेक्षा सरस मानांकन असलेल्या संघातील सहकाऱ्यापेक्षाही माझी कामगिरी सरस झाली.
नऊ स्पेशल स्टेजचा रॅलीत समावेश होता. तीन स्टेज तीन वेळा पूर्ण करण्याचे स्वरुप होते. यात 37 स्पर्धकांनी भाग घेतला. इसुझूच्या विचावात चोत्रावी याने रॅली जिंकली. थायलंडचा अव्वल नॅव्हीगेटर चुपाँग चैवान त्याचा सहकारी होता.
या मालिकेचे थायलंडच्या मुख्य राष्ट्रीय मालिकेच्या तयारीसाठी आयोजन केले जाते. मुख्य मालिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु होत आहे.
संजयने सांगितले की, रॅलीच्या सुरवातीला सकाळच्या सत्रात आमची सुरवात चांगली झाली. विचावत याच्यावर मी 16 सेकंदांनी आघाडी घेतली. पुढील स्टेजमध्ये आठ सेकंदांनी मी पुढे होतो. सर्व्हिस ब्रेकच्या वेळी 30 सेकंदांपेक्षा जास्त आघाडी होती. त्यानंतर मात्र मार्गानुसार अचूक टायर नसल्याचा वेगावर परिणाम झाला. त्यामुळे टोयोटाचे स्पर्धक 2-3 सेकंदांनी पुढे जाऊ लागले. अशावेळी मी वळण सफाईने घेण्यावर भर दिला. त्यामुळे मी फार मागे पडलो नाही. प्राप्त परिस्थीतीत हा निकाल चांगला मानावा लागेल.
संजयने मे महिन्यात युरोपमधील बाल्टीक विभागात लॅट्वीया आणि इस्टोनिया या रॅली पाठोपाठ केल्या. त्यानंतर त्याने ब्रेक घेतला. आता या रॅलीद्वारे त्याने पुन्हा तयारीला सुरवात केली.