पुणे | पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले नव्या मोसमाचा प्रारंभ गतवर्षाप्रमाणेच यंदाही थायलंडमध्ये करेल. नॅव्हीगेटर आणि कार या दोन्ही आघाड्यांवरील प्रगती त्याच्यासाठी उत्साहवर्धक असून जागतिक रॅली मालिकेतील सहभागाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संजय सज्ज झाला आहे. आईसलँडमध्ये बर्फावरील ड्रायव्हिंगमुळे तो आतूर झाला आहे.
आईसलँडहून गुरुवारी परत आल्यानंतर संजय जेमते 48 तासांच्या ब्रेकनंतर थायलंडला रवाना झाला. कंबोडिया-थायलंड सीमेलगत असलेल्या चांताबुरी प्रांतातील पाँग नाम रॉन जिल्ह्यात ही रॅली शनिवारी-रविवारी होत आहे. शनिवारी थायलंडमध्ये गेल्यानंतर संजय लगेच रेकीमध्ये भाग घेईल. रॅली एकूण नऊ स्पेशल स्टेजची आहे. स्पर्धात्मक अंतर 62 किलोमीटर, तर एकूण अंतर 161 किलोमीटर असेल.
मागील वर्षी संजयने मार्च महिन्यातच आणि थायलंडमध्येच या मालिकेद्वारे मोसमाचा प्रारंभ केला होता. त्यात इसुजू डीमॅक्स युटीलीटी कारचे इंजिन बिघडल्यामुळे त्याला रॅली पूर्ण करता आली नव्हती. केवळ दोन किलोमीटर अंतर बाकी असताना त्याची संधी हुकली होती. त्यानंतर नोव्हेंबरमधील फेरीत ड्राईव्ह शाफ्ट तुटल्यामुळे त्याचा तिसरा क्रमांक केवळ 20 सेकंदांनी हुकला. या प्री-रॅली मालिकेतील ही अखेरची फेरी आहे.
टीम इसुझू फुकेट संघाचे प्रमुख तसेच ट्युनर विचाई वात्ताहाविशुथ यांनी त्यानंतर कारवर बरीच मेहनत घेतली आहे. थायलंडचा नॅव्हीगेटर मिनील थान्याफात याच्याबरोबर संजयचा समन्वय सुद्धा आता चांगला झाला आहे. याबद्दल संजयने सांगितले की, सुरवातीला मिनीलचे इंग्रजी उच्चार समजणे अवघड जात होते. तो काही कॉल दोन-दोन वेळा द्यायचा. त्यावर एकदाच कॉल द्यावा, असे काही बदल मी त्याला सुचविले.
थायलंडमध्ये राष्ट्रीय रॅली मालिकेच्या तयारीसाठी वेगळी मालिका होते. त्या प्री-रॅली असे संबोधले जाते. ही फेरी याच प्री-रॅली मालिकेचा भाग असेल. संजयने सांगितले की, प्री-रॅलीचा मार्ग खडतर असतो. थायलंडचे अनेक ड्रायव्हर येथे सराव करतात. बाईकचा गट सुद्धा रॅलीत असतो. यावेळच्या फेरीत 40 कार आणि तेवढ्याच बाईक आहेत. त्यामुळे आव्हान मोठे असेल.
थायलंडमध्ये संजयला प्रेक्षकांचे नेहमीच चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. नोव्हेंबरमधील फेरीच्यावेळी एका तरुण-तरुणीने त्याच्या कारचे फोटो काढून पाठविले. प्रेक्षकांना असा आनंद देऊ शकणे हे जास्त महत्त्वाचे असल्याची भावना संजयने व्यक्त केली.
संजयने जागतिक रॅली मालिकेसाठी मित्सुबिशी मिराज आर 5 कार खरेदी केली आहे. ही कार वेल्समध्ये दाखल झाली आहे. सागरीमार्गे वाहतुकीत काही भाग थोडे गंजल्यामुळे कारला नव्याने रंग दिला जात आहे. त्यामुळे संजयने जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणासाठी अद्याप फेरी नक्की केलेली नाही. हा निर्णय महिनाअखेर अपेक्षित आहे, असे संजयने सांगितले.