एम. एस. धोनी (MS Dhoni) वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो दरवर्षी फक्त IPL मध्येच खेळताना दिसतो. IPL 2025 मध्ये त्याची टीम चेन्नई सुपर किंग्स (CSK) पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी होती. त्यामुळे आता सगळ्यांना एकच प्रश्न सतावतो आहे धोनी IPL 2026 मध्ये खेळणार का? संपूर्ण भारताला या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि आता यावर स्वतः ‘थालाने’ मोठं वक्तव्य केलं आहे.
एम. एस. धोनी (MS Dhoni) अलीकडेच चेन्नईत एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे त्याने IPL मधील आपल्या भविष्यावर भाष्य करताना म्हटलं, “मला आशा आहे की लोक असा विचार करत नसतील की मी अजून 15-20 वर्षं खेळत राहणार आहे. हे फक्त एक-दोन वर्षांचं प्रकरण नाही. तुम्ही मला कायमच पिवळ्या जर्सीत (CSK) पाहाल. मी पुढे खेळणार की नाही, हे तुम्हालाच कळेल.
गेल्या दोन-तीन हंगामांपासून असं होत आलं आहे की, जेव्हा जेव्हा IPL सुरू होण्याची वेळ येते, तेव्हा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण येतं. पण यंदा मात्र हंगाम सुरू होण्याआधीच धोनी खेळणार की नाही, हा प्रश्न विशेषतः CSK चाहत्यांना सतावतो आहे.
काही काळापूर्वी धोनीने सांगितलं होतं की, भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणं हा त्याच्या आयुष्यातला सर्वोत्तम अनुभव होता आणि भारतीय संघानंतर जर काही त्याला विशेष वाटत असेल, तर ती गोष्ट म्हणजे IPL मध्ये खेळणं.
धोनीला गेल्या तीन हंगामांपासून अर्धशतक (फिफ्टी) झळकावता आलेलं नाही. IPL मध्ये त्याने शेवटचं अर्धशतक 2022 च्या हंगामात KKR विरुद्ध नाबाद 50 धावा करून केलं होतं. त्यानंतरच्या 48 डावांमध्ये तो फलंदाजीला आला असला, तरी एकदाही फिफ्टी मारू शकला नाही. मागील पाच हंगामांत धोनीने एकूण 807 धावा केल्या आहेत.






