दिल्ली । सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आज पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात पंजाबने दिल्ली संघाला २ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताचे एकवेळचे स्टार खेळाडू युवराज सिंग आणि गौतम गंभीर चांगलेच चमकले.
युवराजच्या पंजाब संघाने गौतम गंभीरच्या दिल्ली संघाला पराभूत केले. हे त्यांच्या संघांचे कर्णधार नसले तरी संघातील प्रमुख खेळाडू आहेत. विशेष म्हणजे हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना, गौतम गंभीर आणि युवराज सिंग हे एकवेळचे संघाला एकहाती सामना जिंकून देणारे खेळाडू पुन्हा संघात परतण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु एकंदरीत यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पहिली तर गौतम गंभीर हा फक्त समाधानकारक कामगिरी करू शकलेला आहे.
आज जेव्हा दिल्ली येथे पंजाब विरुद्ध दिल्ली सामना झाला त्यापूर्वी काही दिवस युवराज आणि गंभीरमध्ये या सामन्यात कोण अधिक धावा करणार याबद्दल शर्यत लागली होती.
संघ जरी पंजाबचा जिंकला तरी शर्यत मात्र गंभीरने जिंकली आहे. दिल्लीकडून सलामीवीर गौतम गंभीरने ५४ चेंडूत ६६ धावा केल्या तर सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंगने ४० चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. त्यात युवराजच्या ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.