कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात गेल्या १८ ते २९ जुलै दरम्यान ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ अशा फरकाने, तर टी२० मालिकेत श्रीलंकेने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या या श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्यामुळे या दौऱ्यातून अनेक खेळाडूंनी भारतीय संघाकडून पदार्पण केल्याचे दिसून आले.
म्हणून युवा खेळाडूंना संधी
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यावर गेलेल्या संघात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली. विशेष म्हणजे जून-जुलै महिन्यात सर्वांना भारताचे पूर्णपणे २ वेगवेगळे संघ पाहायला मिळाले. एक इंग्लंड दौऱ्यावर गेलेला संघ आणि दुसरा श्रीलंका दौऱ्यावर गेलेला संघ.
श्रीलंका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंचा समावेश असल्याने अनेकांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार, हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. त्यातच टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागले. परिणामी, भारताला राखीव खेळाडू म्हणून श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या ४ खेळाडूंनाही मुख्य संघात सामील करावे लागले. त्यामुळे देखील अनेकांना पदार्पणाची संधी मिळाली.
तब्बल १२ खेळाडूंना पदार्पणाची संधी
या दौऱ्यात वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये मिळून एकूण १२ भारतीय खेळाडूंचे पदार्पण झाले. या १२ मधील काही खेळाडूंनी वनडे, तर काही खेळाडूंनी टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर काही खेळाडूंचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले.
वनडे मालिकेतून इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, कृष्णप्पा गॉथम, नितीश राणा, चेतन साकारिया आणि संजू सॅमसन यांचे वनडे पदार्पण झाले. यातील इशान, सूर्यकुमार, राहुल आणि सॅमसन यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण यापूर्वीच झालेले होते. तर कृष्णप्पा गॉथम, नितीश राणा आणि चेतन साकारिया यांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरले. यातील नितीश राणा आणि चेतन साकारियाला पुढे टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली.
तसेच नितीश आणि साकारियासह पृथ्वी शॉ, वरुण चक्रवर्ती, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल आणि संदीप वॉरियर यांनीही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून पदार्पण केले. यातील पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय पदार्पण यापूर्वीच झालेले होते. तर, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल आणि संदीप वॉरियर यांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरले.
विचार करायचा झाल्यास भारताकडून वनडे आणि टी२० पदार्पण केलेल्या या १२ खेळाडूंचा एक पूर्ण संघ तयार होऊ शकतो.
या खेळाडूंचे झाले भारताकडून वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
१. पृथ्वी शॉ (आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण)
२. ऋतुराज गायकवाड (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण)
३. देवदत्त पडीक्कल (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण)
४. संजू सॅमसन (वनडे पदार्पण)
५. सूर्यकुमार यादव (वनडे पदार्पण)
६. इशान किशन (वनडे पदार्पण)
७. नितीश राणा (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण आणि वनडे पदार्पण)
८. कृष्णप्पा गॉथम (वनडे पदार्पण)
९. राहुल चाहर (वनडे पदार्पण)
१०. चेतन साकारिया (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण आणि वनडे पदार्पण)
११. वरुण चक्रवर्ती (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण)
१२. संदीप वॉरियर (आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण)
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची झाली सांगता; पाहा कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा अन् विकेट्स
‘शिखर सेने’च्या नावे भारताचा टी२० इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव
हसरंगाची वाढदिवशी स्वतःलाच अनोखी भेट, भारतीय संघाचे कंबरडे मोडत रचला नवा विक्रम