मुस्तफिजुर रहमानचे (Mustfijur Rehman) प्रकरण आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) या बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला मुक्त करण्याचे (Release) निर्देश दिले. आता या वादात बांगलादेश सरकारची एन्ट्री झाली असून, ते देशात ‘आयपीएल 2026’ च्या प्रसारणावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.
बीसीसीआयने मुस्तफिजुर रहमानवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच बांगलादेशचे कायदा सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यांनी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे मागणी केली आहे की, भारताच्या या श्रीमंत लीगचे (IPL) सर्व कव्हरेज आणि प्रक्षेपण बांगलादेशात थांबवण्यात यावे.
नजरुल यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी क्रिकेट, क्रिकेटपटू किंवा देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामीचे दिवस आता संपले आहेत.
बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) देखील या भावनेशी सहमत असल्याचे दिसते, मात्र अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी अद्याप यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. कारण, त्यांना अजून बीसीसीआय कडून कोणतीही लेखी नोटीस मिळालेली नाही. दुसरीकडे, बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण सल्लागार सैयदा रिजवाना हसन यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, दुर्दैवाने खेळांमध्ये राजकारण आणले गेले आहे.सहसा खेळ देशांमधील तणाव कमी करतात, पण इथे भारत-बांगलादेशमध्ये उलट घडत आहे. बांगलादेश सरकार आता या प्रकरणात कायदेशीर काय पावले उचलली जाऊ शकतात, याची तपासणी करत आहे.






