क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आयसीसी वनडे विश्वचषकाची ओळख आहे. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होते. शेवटचा वनडे विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंडने जिंकला होता. यावर्षीतचा विश्वचषक हा भारतात आयोजित केला जाणार आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी दावेदार आहेच. पण सोबतच गतविजेत्या इंग्लंडला देखील डावलून चालणार नाही. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या पुनरागमनाविषयी चर्चा सुरू आहेत.
बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आहे. स्टोक्सने मागच्या वर्षी 18 जुलै रोजी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. वनडे क्रिकेटमध्ये यापुढे आपण 100 टक्के योगदान देऊ शकणार नाही, असे सांगत त्याने निवृत्ती घोषित केली होती. मात्र, सध्या आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याचे योगदान संघासाठी अतिशय महत्वाचे ठरू शकते. इंग्लंडच्या टी-20 आणि नवडे संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट (Matthew Mott) याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांच्याही इच्छा आहे की स्टोक्सने निवृत्ती मागे घेत वनडे विश्वचषकात भाग घ्यावा. पण स्टोक्सने अद्याव याविषयी स्पष्ट भूमिका मांडली नाहीये. मॅथ्यू मॉट याविषयी म्हणाले, “ते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. स्टोक्सने अद्याव याविषयी स्पष्टीकरण दिले नाहीये. तो विश्वचषकात खेळणार आहे की नाही, हे अद्याप निश्चित झाले नाहीये. पण आम्हाला आशा आहे की, विश्वचषकात नक्कीच भाग घेईल. स्टोक्स जर विश्वचषकात खेळला, तर त्याची गोलंदाजी संघासाठी बोनस असेल.”
“बेन स्टोक्स फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम आहेच. पण गोलंदाजी खरोखर कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच त्याने 2023 विश्वचषक खेळावा, अशी आमची इच्छा आहे. आम्ही संपूर्ण ऍशेस मालिकेत स्टोक्सला पाहिले आहे. त्याने अप्रतिम खेळी केली आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून तो असे करत आला आहे. त्याच्यासारखे खेळाडू वनडे क्रिकेटमध्ये एक्स फॅक्टर (महत्तवाची भूमिका बजावणारे) प्रमाणे काम करतात,” असेही मॅथ्यू मॉट पुढे म्हणाले.
दरम्यान, स्टोक्सच्या वनडे कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या फॉरमॅटमध्ये 105 सामन्यांमध्ये 2924 धावा केल्या आहेत. सोबतच 74 विकेट्स देखील घेतल्या आहेत. यात 3 शतक आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 61 धावा खर्च करून 5 विकेट्स हे त्याचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे. इंग्लंडला 2019 विश्वचषक जिंकवून देण्यात स्टोक्सचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले होते. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी लवकरच इंग्लंडचा संघ घोषित केला जाऊ शकतो. पण त्याआधी स्टोक्स काय निर्णय घेणार, हे पाहण्यासारखे असेल. (The England management is set to communicate with Ben Stokes to reconsider his ODI retirement)
महत्वाच्या बातम्या –
इंग्लिश फास्ट बॉलरने वाढदिवशी घेतली हॅट्रीक, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा पराभूत करत मोठा विक्रम नावावर
आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी