पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत क्वालिफायर २लढतीत साहिल पारिख(६८धावा), अथर्व काळे (नाबाद ५३) यांनी धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ५बाद २०२ धावांचा डोंगर उभा केला. अंकित बावणेने आक्रमक फलंदाजी करत ४७चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. आक्रमक अर्धशतक खेळी करताना अंकित बावणेने ३चौकार व ३टोलेजंग षटकार मारले. त्याला सचिन धसने २९चेंडूत ७चौकार व १षटकारासह ४५धावांची ताबडतोब खेळी करून साथ दिली. या सलामी जोडीने ५१चेंडूत ८३धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात सचिन धस झेल बाद झाला. प्रशांत सोळंकीने त्याला झेल बाद केले. पाठोपाठ राहुल त्रिपाठी (११) ला देखील झेल बाद करून कोल्हापूर संघाला दुसरा धक्का दिला. त्यानंतर अंकितने सिध्दार्थ म्हात्रेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी ४१चेंडूत ६१ धावांची भागीदारी करून संघाची धावगती वाढवली. सिध्दार्थ म्हात्रेने २६चेंडूत ४चौकार व १षटकारासह ३८धावा केल्या. त्यानंतर अंकितने योगेश डोंगरे(१८) च्या समवेत भागीदारी करून संघाला २००धावांचा टप्पा पार करुन दिला.
२०२धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाने १८षटकात ४बाद २०५धावा काढून पुर्ण केले. मंदार भंडारी (१९) व अर्शिन कुलकर्णी(११)हे सलामीचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या साहिल पारिखने ३३ चेंडूत ६८धावांची तुफानी खेळी केली. साहिलने अफलातून फलंदाजी करताना ३चौकार व ६उत्तुंग षटकार ठोकले. साहिल व कौशल तांबे (२८धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५चेंडूत ९६धावांची भागीदारी करताना संघाच्या डावाला आकार दिला. १३व्या षटकात अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू अथर्व डाकवेने साहिल पारिखला झेल बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ पुढच्याच षटकात श्रेयस चव्हाणने कौशल तांबेला पायचीत बाद केले व नाशिक टायटन्स संघाला चौथा धक्का दिला.
त्यानंतर अथर्व काळेने २०चेंडूत ५३धावांची वादळी खेळी केली. त्याने आपले अर्धशतक साजरे करताना २चौकार व ७षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. अथर्व व रणजीत निकम(नाबाद १४) यांनी पाचव्या विकेटसाठी ३९चेंडूत ६९धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स: २०षटकात ५बाद २०२धावा(अंकित बावणे नाबाद ७७(४७,६×४,३×६), सचिन धस ४५(२९,७×४,१×६), सिध्दार्थ म्हात्रे ३८(२६,४×४,१×६), योगेश डोंगरे १८, राहुल त्रिपाठी ११, मुकेश चौधरी २-३५, प्रशांत सोळंकी २-३२) पराभुत वि. ईगल नाशिक टायटन्स: १८षटकात ४बाद २०५धावा(साहिल पारिख ६८(३३,३×४,६×६), अथर्व काळे नाबाद ५३(२०,२×४,७×६), कौशल तांबे २८, रणजीत निकम नाबाद १४, श्रेयस चव्हाण २-४७, अथर्व डाकवे १-३५, उमर शहा १-२७); सामनावीर – साहिल पारिख.