नुकताच आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २७ धावांनी विजय मिळवला आणि चौथे जेतेपद आपल्या नावावर केले. या सामन्यानंतर धोनी आगामी आयपीएल स्पर्धेत खेळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशात त्याच्या खेळण्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल स्पर्धेतील चौथे जेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर तो आता टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मेंटोरची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, हा एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असणार आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, आगामी हंगामात देखील एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “खरं सांगायचं झालं तर, आगामी आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात पहिले रीटेंशन कार्ड एमएस धोनीसाठी वापरले जाणार आहे. जहाजाला आपल्या कॅप्टनची गरज असते. निश्चिंत राहा तो पुढच्या वर्षी देखील येईल.”
तसेच सीएसकेला आयपीएल हंगामात अव्वलस्थानी ठेवण्याबाबत बोलताना अधिकारी म्हणाले की, “संघाला कुठलाही त्रास होणार नाही यासाठी आम्हाला एक मजबूत संघ तयार करावा लागणार आहे. एक मजबूत संघ तयार करण्यासाठी आम्हाला हेही पाहावे लागणार आहे की, येणाऱ्या १० वर्षात कोण आम्हाला योगदान देऊ शकतो.” आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे.
अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा जोरदार विजय
दरम्यान अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ८६ तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर १९२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने ५१ तर व्यंकटेश अय्यरने ५० धावांची खेळी केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला ना रोहित ना विराटची भिती; कर्णधार आझम म्हणाला, ‘या’ मातब्बर फलंदाजासाठी करतोय तयारी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारत सुरू करणार टी२० विश्वचषकाचा महारणसंग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक