आयपीएल २०२२ (ipl 2022) विषयी चाहत्यांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामापूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलावाचे आयोजन केले आहे. मेगा लिलावात अनेक दिग्गजांवर बोली लागताना दिसणार आहे. लिलावासाठी जगभरातल एकूण १२१४ खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्या खेळाडूंवर आयपीएल मेगा लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आपण या लेखात अशाच पाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी बीबीएलमध्ये कमाल प्रदर्शन केले आहे आणि आता ते आयपीएलमध्ये मोठी रक्कम कमवण्याची शक्यता आहे.
1. बेन मॅकडरमॉट
या यादीत पहिले नाव आहे ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज बेन मॅकडरमॉटचे. बेनने बीबीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात तुफान फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा बनवल्या. होबार्ट हरिकेन्ससाठी खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये त्याने १५३.६७ च्या स्ट्राइक रेट आणि ४८.०८ च्या सरासरीने ५७७ धावा केल्या. यामध्ये त्याच्या दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
बेन आतापर्यंत आयपीएलमध्ये एकदाही खेळला नाहीय, पण बीबीएलमधील प्रदर्शन पाहता, त्याला पुढच्या हंगामात खेळण्याची संधी मिळू शकते. बेन संघासाठी मधल्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो, सोबतच तो शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावाही बनवू शकतो. मेगा लिलावात नक्कीच सर्व फ्रेंचायझींचे लक्ष त्याच्यावर असेल.
2. पीटर सीडल
यादीत दुसरे नाव अनुभवी वेगवान गोलंदाज पीटर सीडलचे आहे. सीडलने बीबीएलमध्ये यावर्षी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये त्याने १७.७३ च्या सरासरीने एकूण ३० खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. त्याचे वय सध्या ३७ वर्ष आहे, पण अजूनही तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये त्याच्या चांगल्या फॉर्मव्यतिरिक्त त्याचा अनुभवही फ्रेंचायझींच्या कामाचा ठरेल. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामूळे तो संपूर्ण हंगामात उपस्थित असेल. अशात मेगा लिलावात त्याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील
3. जेसन सांघा
२०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणाऱ्या जेसन सांघाचेही नाव या यादीत आहे. बीबीएलमध्ये यावर्षी त्याने चांगली फलंदाजी केली. सिडनी थंडर्ससाठी खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये त्याने ४९.४४ ची सरासरी आणि १३२ च्या स्ट्राइक रेटने एकूण ४४५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश होता. २२ वर्षी सांघा संघासाठी वरच्या फळीत चांगली फलंदाजी करू शकतो, सोबतच फायदेशीर फिरकी गोलंदाजीही करू शकतो. बीबीएलमध्ये त्याने यावर्षी चार विकेट्सही घेतल्या.
4. एश्टन एगर
एश्टल एगरने यावर्षी बीबीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि सर्वांना प्रभावित केले. पर्थ स्कॉर्चर्ससाठी खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये त्याने २१.८९ च्या सरासरीने १८ विकेट्स नावावर केल्या. अनुभवी फिरकीपटू असलेला एगर संघासाठी खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करू शकतो. टी२० मध्ये त्याचा स्ट्राइक रेट ११७ राहिला आहे आणि त्याच्या नावे एक अर्धशतकही आहे. एगर ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे आणि मेगा लिलावात ही गोष्ट त्याच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
5. डॅनियल सॅम्स
या यादीत शेवटचे नाव आहे डॅनियल सॅम्सचे. बीबीएलमध्ये यावर्षी सॅम्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. त्याने १५ सामन्यांमध्ये १६२ च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा केल्या आणि २४.५७ च्या सरासरीने एकूण १९ विकेट्स घेतल्या. अशात सॅम्स आयपीएल मेगा लिलावात मोठी रक्कम मिळवू शकतो. मागच्या वर्षी आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीने सॅम्सला २० लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. परंतु, तो पाच सामन्यात फक्त एक विकेट घेऊ शकला होता. यावर्षी आयपीएमध्ये संधी मिळाल्यावर तो धमका करू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम
शुबमन गिलला रिलीज केल्याचा केकेआरला होतोय पश्चाताप! कोच मॅक्युलम म्हणाला…
इयान चॅपलकडून विराट कोहलीचे कौतुक, म्हणाले – तो सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता
व्हिडिओ पाहा –