इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना रोमांचक ठरला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत चौथ्यांदा जेतेपद पटकावले. तर केकेआर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. यापूर्वी कोलकाता संघाने दोन वेळा जेतेपद पटकावले होते.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने केकेआरला १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआर संघ ९ विकेट गमावून केवळ १६५ धावा करू शकला. संघासाठी शुभमन गिलने ४३ चेंडूत ५१ धावा केल्या, तर व्यंकटेश अय्यरने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. सामन्याच्या एका टप्प्यावर, केकेआर संघाची धावसंख्या एकही विकेट न गमावता ९१ धावा होती, पण त्यानंतर संघाची फलंदाजी कोलमडली. अंतिम सामन्यात केकेआरच्या पराभवाची ५ मोठी कारणे जाणून घेऊ या.
१. फाफ डू प्लेसिसला दिनेश कार्तिककडून जीवदान
सीएसकेने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. चेन्नई संघासाठी सलामीवीर फाफ डू प्लेसिसने ५९ चेंडूत ८६ धावा केल्या. जेव्हा डू प्लेसिस डावाच्या सुरुवातीला २ धावांवर होता, तेव्हा त्याला केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडून जीवदान मिळाले. चेन्नईच्या डावातील हे तिसरे षटक होते. फिरकीपटू शाकिब अल हसनच्या पहिल्याच चेंडूवर डू प्लेसिसला यष्टीचीत करण्याची संधी होती, पण कार्तिकला ती संधी साधता आली नाही.
२. शुबमन गिल संथ फलंदाजी
केकेआर संघाचा सलामीवीर शुबमन गिलच्या संथ फलंदाजीनेही संघाला मागे खेचले. शुबमनने ४३ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट ११८.९० होता. एकीकडे व्यंकटेश अय्यर झटपट खेळी खेळत होता, तर दुसरीकडे गिलचा संथ डाव केकेआरवर दबाव वाढवत होता. अशा परिस्थितीत व्यंकटेशने ३२ चेंडूत ५० धावा केल्यावर त्याची विकेट गमावली.
३. ओएन मॉर्गनचा खराब फॉर्म
या हंगामात ओएन मॉर्गनचा फॉर्म अत्यंत खराब राहिला आहे. मॉर्गनने गेल्या १० सामन्यांमध्ये फक्त ४१ धावा केल्या आहेत. या दरम्यान, तो फक्त एकदाच दुहेरी आकडा गाठू करू शकला आणि त्या सामन्यात त्याने १३ धावा केल्या. या १० सामन्यांमध्ये मॉर्गनला दोनदा खातेही उघडता आले नाही. मॉर्गनने या संपूर्ण हंगामात १७ सामने खेळले आणि ११.०८ च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ १३३ धावा केल्या.
४. अंतिम सामन्यात वरून चक्रवर्ती अपयशी
आतापर्यंत केकेआरचा ट्रम्प कार्ड त्यांचा लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती होता. पण अंतिम सामन्यात त्याचे अपयश केकेआरसाठी सर्वात मोठी समस्या ठरली. वरुणने ४ षटकांत ३८ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. वरुणने संपूर्ण हंगामात १७ सामने खेळले आणि १८ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ६.५८ होता.
५. राहुल त्रिपाठीचे जखमी होणे
क्वालिफायर २ सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सला सामना जिंकवून देणारा राहुल त्रिपाठी अंतिम फेरीत जखमी झाला होता. मात्र, अंतिम फेरीत क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे, कर्णधार ओएन मॉर्गनला फलंदाजी दरम्यान संपूर्ण फलंदाजी क्रम बदलावे लागले. यामुळे मधली फळीही नीट सेट होऊ शकली नाही. अखेरीस जेव्हा राहुल आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने ३ चेंडूत फक्त २ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज, अव्वलस्थानी शार्दुलचा दबदबा
जिथे जाऊ, तिथे आमचाच बोलबाला! आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारे ५ खेळाडू
आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय