भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही काळापासून खराब फॉर्म आणि दुखापतीशी झगडत आहे. त्यामुळे पुढीलवर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमधील तिच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. पण आता ती या ऑलिंपिकच्या शर्यतीत कायम असल्याचे तिने सांगितले आहे.
सायना पुढीलवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या एशियन टूर स्पर्धेतून बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. एका व्हर्चूएल चर्चा सत्रात ती म्हणाली, ‘मला माहित आहे ऑलिंपिक सर्वांच्याच डोक्यात आहे. ही नक्कीच मोठी स्पर्धा आहे. पण त्याआधी तुम्हाला अनेक स्पर्धांबद्दल विचार करावा लागतो. मला माझी लय मिळवून अव्वल 20 क्रमांकांमध्ये असणाऱ्या खेळाडूंना पराभूत करावं लागेल.’
तसेच ती म्हणाली, ‘आधी 2 ते 3 महिने सराव करावा लागेल. 7-8 स्पर्धा खेळण्यासाठी पुर्णपणे सज्ज असायला हवे. त्यानंतरच मी ऑलिंपिकबद्दल विचार करु शकेल. पण नक्कीच मी त्यासाठी शर्यतीत असेल. मला चांगली कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.’
30 वर्षीय सायनाने असेही म्हटले आहे की ती रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्स यांच्याकडून प्रेरणा घेते. त्यांनीही वयाच्या 30 व्या वर्षानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
तसेच ऑलिंपिक पदक विजेती सायना म्हणाली, ‘मला लढायला आवडते. मी घरी बसून काय करु? हे माझे आयुष्य आहे, हेच माझे काम आहे.’ त्याचबरोबर सायना म्हणाली आता ती तंदुरुस्त आहे.