पुणे : येत्या काही दिवसांतच म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यात विशेष बाब म्हणजे तब्बल २७ वर्षानंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित राजेंद्र पवार आणि अॅपेक्स बॉडीच्या प्रयत्नाने या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाले आहे. यात मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा १९ ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना हा असेल.
पुणेकरांसाठी अजून आनंदाची बातमी म्हणजे एमसीएचे अध्यक्ष श्री. रोहित राजेंद्र पवार यांच्या प्रयत्नांतून आणि बीसीसीआय व आयसीसीच्या सहकार्याने २६ सप्टेंबरला आयसीसी विश्वचषक ट्रॉफीचे पुण्यात आगमन होणार आहे.
एमसीएचे अध्यक्ष श्री. रोहित राजेंद्र पवार म्हणाले की, “पुण्यातील क्रिकेटरसिकांना विश्वचषकाची ट्रॉफी प्रत्यक्ष बघता यावी आणि तिच्यासोबत सेल्फी काढता यावा यासाठी ही ट्रॉफी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रेक्षकांसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय खेळाडू, एमसीए प्रेसिडेंट, एमसीएची अॅपेक्स बॉडी, सर्व मेंबर्स, भारतीय खेळाडू, महाराष्ट्र संघाचे कर्णधार केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाड तसेच महाराष्ट्र संघातील सर्व आजी-माजी खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयसीसी विश्वचषक २०२३ ट्रॉफीची पुण्यात मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी १ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएटपासून रॅलीला सुरवात होणार असून सिंबायोसिस कॉलेज, बीएमसीसी कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज येथून फर्ग्युसन रस्त्याने कृषी महाविद्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात येईल. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ४.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान क्रिकेट रसिकांना पाहण्यासाठी ही ट्रॉफी ठेवण्यात येणार आहे. ”
या मिरवणुकीत विश्वचषकाच्या स्वागतासाठी सुपरबाईक रॅली, बायसिकल रॅली, ढोल ताशा पथक आणि फ्लॅश मॉब हे विशेष आकर्षण असेल. सामान्य क्रिकेट रसिकांना प्रत्यक्ष विश्वचषक बघता यावा, हा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे २६ सप्टेंबर रोजी हा विश्वचषक बघण्यासाठी आणि भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले आहे.
कोट
‘आयसीसी ट्रॉफीचे पुण्यात आगमन झाल्यानंतर हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएटपासून सिंबायोसिस, बीएमसीसी, एमएमसीसी, फर्ग्युसन रोड मार्गे कृषी महाविद्यालयापर्यंत या ट्रॉफीची अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात येणार येईल आणि सायंकाळी ४.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदादनावर ही ट्रॉफी सर्वांना पाहण्यासाठी ठेवणार आहेत. अशा प्रकारे ट्रॉफी पुण्यात आल्यानंतर सामान्य लोकांना ही ट्रॉफी बघता यावी यासाठी पहिल्यांदाच मिरवणूक काढण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेट, खेळाडू आणि वर्ल्ड कपला मानवंदना द्यावी, ही विनंती. आयसीसी आणि बीसीसीआयच्या सहकार्याने आणि एमसीएच्या मार्गदर्शनाखाली देशात प्रथमच अशा प्रकारे मिरवणूक काढण्याचा मान एमसीएला मिळाला, याचा अभिमान वाटतो.”- रोहित पवार (प्रेसिडेंट, एमसीए)
महत्वाच्या बातम्या –
सहा वर्षांनंतर एकत्र खेळणार अश्विन आणि जडेजा, ‘अशी’ असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
फूड डिलिवरी बॉयचं नशीब चमकलं! लोकेश कुमार रातोरात नेदर्लंडच्या ताफ्यात सामील