भारतीय हॉकी संघाने २०२२ बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने ब्रिटनमधील कोरोनाची स्थिती आणि तेथील विलगीकरणाच्या कालवधीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटनमध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी १० दिवसांचा विलगीकरण कालावधी बंधनकारक आहे. भारतीय संघाने आगामी काळातील एशियन गेम्साला प्राधान्य देत कॉमनवेल्श गेम्समधून माघार घेतली.
हॉकी इंडियाने संघाच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनि सांगितले आहे की, ‘यूरोपमध्ये ब्रिटन असा देश आहे, जो कोरोनामुळे खूप प्रभावित झाला आहे. आमची प्राथमिकता एशियन गेम्स आहे. त्याचे आयोजन २०२२ मध्येच चीनच्या ग्वांगझू मध्ये होणार आहे. एशियन गेम्समधूनच भारतीय संघ २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वाॅलिफाय होतील.’
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनीही याबाबत त्यांचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघ अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना सांगितला आहे. निंगोबम यांनी लिहिले की, ‘पुढच्या वर्षा २८ जुलैपासून ते ८ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या कॉमनवेल्श गेम्स आणि १० सप्टेंबरपासून होणाऱ्या एशियन खेळांमध्ये फक्त ३२ दिवसांचे अंतर आहे. एशियाई खेळांचा विचार केला तर, भारतीय हॉकी संघ त्यांच्या हॉकी संघाला बर्मिंघमला पाठवून धोका पत्करू इच्छित नाही. यामुळे ऑलिम्पिक क्वालिफिकेशनवरही फरक पडू शकतो.’
इंग्लंड हॉकी संघानेही रद्द केला होता भारताच दौरा
यापूर्वी इंग्लंड हॉकी संघाने भारतात पुढच्या महिन्यात होणाऱ्या एफआईएच जूनियर हॉकी विश्वचषकातून माघार घेतली होती. कोरोनाच्या खबरदारीसाठी ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवासांचा विलगीकरण कालावधी पार पाडावा लागतो. याच पार्श्वभूमीवर ब्रिटन संघाने हा निर्णय घेतला होता. ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारतीय संघानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत कॉमनवेल्थ गेम्समधूम माघार घेतली आहे. जूनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत भुवनेश्वरमध्ये खेळली जाणार आहेत.
भारत – यूके कोरोना नियमांवरून सुरू आहे वाद
दरम्यान, भारत आणि यूकेमध्ये कोरोनाच्या नियमांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद चालू आहे. यूके सरकारणे आधी भारतीय कोरोना प्रतिबंधक वॅक्सीनला मान्यता दिली नव्हती. आता मान्यता दिली आहे, पण भारतीय नागरिकांना तेथे गेल्यावर विलगीकरणात राहावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी असेच नियम लागू केले आहेत. याचा परिणाम आता दोन्ही देशांच्या हॉकी संघांवर झालेला पाहायला मिळत आहे.