भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता चाहत्यांना वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०१८-१९ या एक वर्षासाठी जम्मू आणि काश्मीर संघाचा प्रशिक्षकासह मार्गदर्शक असणार आहे.
याबद्दल जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे सीईओ आशिक बुखारी म्हणाले, “तो आमच्या संघाचा पुढील एक वर्षासाठी प्रशिक्षकासह मार्गदर्शकही असेल.”
इरफान पठाण मागील काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच त्याला बडोदा संघानेही मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतून वगळले होते. त्याचबरोबर याआधीही २०१७-१८ या रणजी मोसमाच्या सुरुवातीला पठाणला बडोदा संघाचे कर्णधार करण्यात आले होते. परंतु दोन सामने झाल्यावर त्याला कर्णधारपदावरून तसेच संघातून काढण्यात आले.
यामुळेच इरफानने बडोदा क्रिकेट संघटनेला दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती.
२००३ मध्ये पदार्पण केलेल्या इरफानने भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. तसेच मागील दोन वर्ष त्याने बडोदा संघाचे कर्णधारपदाही भूषवले आहे.
जम्मू काश्मीर संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर त्याने शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर तरुण क्रिकेटपटूंशी संवाद साधला. यात त्याने पुढच्या टप्प्यावर जायचे असेल तर कष्ट करावे लागतील असे सांगितले.