भारतात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्याचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला आहे. हा हंगाम २९ सामन्यांनंतर संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू हळू-हळू त्यांच्या मायदेशी परतत आहे. असे असतानाच न्यूझीलंडच्या कसोटी संघातील काही खेळाडू जे आयपीएल २०२१ चा भाग होते ते मायदेशी परतलेले नाहीत त्यांनी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील परिस्थितीपासून मालदीवला जाण्याचा निर्णय
खरंतर जूनमध्ये सुरुवातीलाच न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यांना भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना देखील इंग्लंडमध्येच खेळायचा आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा भाग असलेले केन विलियम्सन, काईल जेमिसन आणि मिशेल सँटेनर हे खेळाडू आणि फिजीओ टॉमी सिमसेक जे आयपीएलचा भाग होते, ते भारतातूनच इंग्लंडला ११ मे रोजी रवाना होणार होते.
मात्र, दिल्लीतील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहून या खेळाडूंनी मालदीवला जाण्यास पसंती दिली आहे. दिल्लीत सध्या रोज २० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळत आहे. त्यामुळे ज्यादाची जोखीम घेण्यापेक्षा मालदीवला जाणे त्यांनी पसंत केले.
सध्या आयपीएल २०२१ हंगामाचा भाग असलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचकांचा संपूर्ण ताफा मालदीवमध्ये आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या सर्वांसाठी सीमाबंदी केली असल्याने त्यांना त्यांच्या मायदेशाच १५ मेपर्यंत जाता येणे शक्य नसल्याने त्यांना मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथून ते मायदेशी परततील. आता त्यांना न्यूझीलंडचे ४ सदस्य देखील जोडले जातील.
याबद्दल सनरायझर्स हैदराबादच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिली दिली की ‘केन आणि न्यूझीलंडचे आणखी सदस्यांना दिल्लीतील कोविडची परिस्थिती पाहून तिथे राहाणे सुरक्षित वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला आहे.’
न्यूझीलंडचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडच्या या ४ सदस्यांव्यतिरिक्य आयपीएल २०२१ चा भाग असलेले अन्य सदस्य न्यूझीलंडला परतले आहेत. केवळ टीम सिफर्टला भारतात रहावे लागणार आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असलेला सिफर्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला आणखी काही दिवस भारतात क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
कोलकाताचे आत्तापर्यंत ४ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याच्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे कोलकाताचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांचा देखील कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना! ‘या’ खेळाडूंना निवडणे टीम इंडियाला पडणार महागात, आहेत ‘आऊट ऑफ फॉर्म’
न्यूझीलंड आणि इंग्लंडशी दोन हात करण्यास ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार रवाना; पाहा कसे असेल सर्व नियोजन