भारतीय महिला संघाकडून पहिल्या दोन सामन्यात ९० आणि नाबाद १०६ धावांची खेळी करणाऱ्या स्मृती मंधानाची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु झाली होती. परंतु पहिल्या दोन सामन्यानंतर या खेळाडूला ७ सामन्यात विशेष काही छाप सोडता आली नाही.
पहिल्या दोन सामन्यात १९६ च्या सरासरीने १९६ धावा करणाऱ्या मंधानाकडून पुढील ७ सामन्यात मोठी निराशा क्रिकेट चाहत्यांच्या पदरी आली. आज अंतिम सामन्यातही ही खेळाडू शून्य धावांवर बाद झाली. दुसऱ्या सामन्यातील शतकी खेळीनंतर स्मृतीने पुढील सात सामन्यात २, ८, ४, ३, १३, ६, ० अशा खेळी केल्या आहेत. ७ सामन्यात तिने ५.१४ च्या सरासरीने ३६ धावा केल्या आहेत.
संपूर्ण स्पर्धेत स्मृतीने ९ सामन्यात २९ च्या सरासरीने २३२ धावा केल्या आहेत. त्यात एक शतकी आणि एक अर्धशतकी खेळीचा समावेश आहे.