पुणे, २६ सप्टेंबर २०२३: विश्वचषकाची अभूतपूर्व मिरवणुक व करंडक जवळून बघून त्याचा फोटो काढण्याचा आनंद आज पुण्यातील क्रिकेट रसिकांनी घेतला.
तत्पूर्वी एमसीएच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संघटनेचे सर्व पदाधिकारी, आर एम डी ग्रुप, चिंचवड या शाळेचे विद्यार्थी, महाराष्ट्राचे 19 वर्षाखालील संघ (मुले व मुली), महाराष्ट्राच्या खेळाडू तेजल हसबनीस, किरण नवगिरे यांच्या उपस्थितीत विश्वचषकाचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले. त्यांनतर जे डब्लू मेरीएट हॉटेल येथे पत्रकारांसाठीदेखील एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी विश्वचषकाचे अनावरण करून मिरवणुकीची सुरुवात केली.
आम्ही एमसीएचे पदाधिकारी केवळ आमच्या पुरता विश्वचषकाची फोटो काढू शकलो असतो. परंतु हा करंडक चाहत्यांचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. त्यामुळे तो बघण्याची संधी सर्वांना मिळावी, असे महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. एमसीए ही एकमेव राज्य संघटना आहे, ज्यांनी अशा प्रकारची भव्य मिरवणूक आयोजित केली. इतर कुठल्याही राज्य संघटनांनी अशा प्रकारची रॅली आयोजित केलेली नाही. या रॅलीद्वारे चाहत्यांना मूळ विश्वचषक कसा असतो ते याची देही याची डोळा अनुभव घेता आला व त्याच्या बरोबर फोटो काढता आला.
एमसीए च्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रिय स्टेडियम मध्ये विश्वचषकाचे पाच सामने होणार आहेत. ज्यात भारत विरुध्द बांगलादेश ह्या १९ ऑक्टोबरच्या सामन्याचा देखील समावेश आहे. यावेळी पत्रकार परिषदेस संघटनेचे सचिव शुभेंद्र भांडारकर, सर्वोच्च परिषदेचे सदस्य सुहास पटवर्धन, सुनिल मुथा, सुशिल शेवाळे, ॲड. अजय देशमुख, रणजीत खिरिड, विनायक द्रविड, कमलेश पिसाळ, राजू काणे, सचिन मुळ्ये, संतोष बोबडे, संजय बजाज, केशव वझे व कल्पना तापकीर, एमसीएचे सीओओ अजिंक्य जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्राचा विश्व चषक खेळलेला खेळाडू केदार जाधव, माजी कर्णधार चंदू बोर्डे आदी आजी व माजी खेळाडू जोशाने रॅलीत सहभागी होते. पुण्यातील जे डब्लू मेरीएट हॉटेल पासून सेनापती बापट रस्ता, बीएमसीसी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता ते कृषी महाविद्यालय अशी ही मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणुकीस चाहत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी विविध ढोल ताशा पथकांनी वादन केले, दुचाकी स्वारांनी रॅलीत सहभाग घेतला. फर्ग्युसन कॉलेज जवळ तुफान पावसात देखील ढोल ताशा पथक व चाहते यांनी त्यांचे क्रिकेट वरचे प्रेम दाखवून दिले.
दुपारी 1च्या सुमारास विश्वचषकाची रॅली सुरवातीपासूनच मोठ्या जल्लोषात निघाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चाहत्यांनी ‘ जितेगा भाई जितेगा इंडीया जितेगा’, ‘वंदे मातरम्’, गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा दिल्या. कृषी महाविद्यालय येथे एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी उपस्थित चाहत्यांचे आभार मानले व विश्वचषकचाहत्यांना पाहण्यासाठी खुला केला. वर्ल्ड कपच्या अनुषंगाने स्टेडियममध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जसं की, प्रेक्षकांसाठी आछादित स्टँड, पार्किंग व्यवस्था व एकंदरित सामना बघण्याचा चांगला अनुभव. पवारांनी यावेळी असेही सांगितले की, आपण एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम पूर्णतः हरित करण्याच्या मार्गावर आहोत.
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड संघाचा स्पेशल विजय, 15 वर्षांमध्ये बांगलादेशमध्ये केली ‘ही’ मोठी कामगिरी
अभिमानास्पद! चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताने घोडेस्वारीत जिंकलं गोल्ड मेडल