सिडनी। गुरुवारपासून(3 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने आज(2 जानेवारी) 13 जणांचा संघ घोषित केला आहे.
या संघात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या तीनही कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली होती.
पण आता बीसीसीआयने प्रसिद्ध पत्रकात जाहीर केले आहे. यात सांगण्यात आले आहे की इशांत शर्माला बरगड्यांची दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या फिजीओ उपचार करत आहेत.
त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआय प्रसिद्ध पत्रकात माहिती दिली आहे, ‘त्याला डाव्या बरगड्यांच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापक सिडनी कसोटीसाठी कोणतीही धोका पत्करण्यास तयार नाही. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.’
तसेच सिडनी कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या संघात आर अश्विनचाही समावेश करण्यात आला असला तरी तोही पुर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यालाही सिडनी कसोटीत बाहेर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे.
तो पर्थ आणि मेलबर्न कसोटीतूनही पोटाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. पर्थ कसोटीत त्याच्या ऐवजी हनुमा विहारी तर मेलबर्न कसोटीत रविंद्र जडेजा खेळला.
त्याचबरोबर सिडनी कसोटीसाठी निवड झालेल्या 13 जणांच्या संघात केएल राहुल, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांनाही संधी मिळाली आहे. त्यामुळे आता अंतिम 11 जणांच्या संघात कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
असा आहे 13 सदस्यांचा भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या:
–असे आहे टीम इंडियाचे २०१९ चे संपुर्ण वेळापत्रक
–१३ जणांच्या टीम इंडियात निवड झालेला हा खेळाडू सिडनी कसोटीतून बाहेर
–स्म्रीती फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आहे तरबेज!