जगमोहन दालमिया हे नाव भारतीय आणि जागतिक क्रिकेट वर्तुळासाठी कायम न विसरणाऱ्या नावांपैकी एक आहे. भारतीय खेळाडूंनी ज्याप्रकारे आपल्या मेहनतीने आणि खेळाने क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्याच प्रकारे प्रशासनात काम करताना, क्रिकेटला एक वेगळा आयाम देण्याचे काम दालमिया यांनी केले. आज आपण जगमोहन दालमियांविषयी जरा जाणून घेऊया.
जगमोहन दालमिया यांचा उदय
मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये ‘जग्गू दा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या जगमोहन दालमिया यांनी १९७९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयमध्ये पाऊल ठेवले. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे ते सदस्य होते. त्यावेळी आत्ता इतकी स्पर्धा नसल्याने पुढच्या दोन वर्षात लगेचच बीसीसीआयच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
तो काळ असा होता, ज्यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटवर वर्चस्व होते. सर्व मोठ्या स्पर्धा असोत किंवा कसले निधी यातील मोठा वाटा इंग्लंड व ऑस्ट्रेलियाला जात. भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि गोष्टी बदलायला सुरुवात झाली.
दालमिया यांनी आयएस बिंद्रा यांच्यासमवेत हातमिळवणी करत भारताला क्रिकेटचा तिसरा गड करण्याचे ठरविले. पुढच्या चार वर्षात विश्वचषकाचे आयोजन भारत करणार होता. आधीचे तीन विश्वचषक इंग्लंडमध्ये झाले होते. प्रथमच विश्वचषक आशियात आणला गेला आणि यात सिंहाचा वाटा जगमोहन दालमिया यांचा होता.
१९९२ मध्ये बिंद्रा बीसीसीआयचे अध्यक्ष असताना, दालमिया यांची निवड आयसीसीचे सचिव म्हणून झाली. यानंतर दालमिया यांनी भारतीय क्रिकेट बदलायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
१९९३ आधी क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाची मक्तेदारी एकट्या दूरदर्शनकडे होती. क्रिकेट सामने प्रक्षेपित करावे म्हणून बीसीसीआयला दूरदर्शनला प्रत्येक सामन्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागत.
क्रिकेटमधील आर्थिक क्रांतीचे जनक
दालमिया व बिंद्रा या जोडीने प्रशासनात येत पहिली दूरदर्शनची मक्तेदारी मोडीत काढली. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठीचे प्रक्षेपणाचे हक्क ट्रांस वर्ल्ड इंटरनॅशनल या खाजगी कंपनीला १८ लाख रुपये प्रति सामना असे विकले. पुढे हे हक्क दूरदर्शनला ट्रांस वर्ल्ड इंटरनॅशनल कडून विकत घ्यावे लागले. या सर्वांमध्ये बीसीसीआयला सहा लाख अमेरिकन डॉलर इतका घसघशीत नफा झाला.
१९९३ च्या इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सामन्यांचे प्रक्षेपण खाजगी कंपनीद्वारे केले गेले. यामुळे बीसीसीआय आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यामध्ये वाद सुरू झाला. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आणि त्याचा निकाल बीसीसीआयच्या बाजूने लागला.
सुप्रीम कोर्टाने आपल्या ऐतिहासिक निकालात म्हटले की,
” येथून पुढे खासगी संस्थांच्या प्रक्षेपणावर सरकारची किंवा राज्यांची मक्तेदारी राहणार नाही.”
सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने बीसीसीआयला आपल्या सामन्यांचे प्रक्षेपणाचे हक्क विकण्याचा मार्ग मोकळा झाला.
दालमिया यांनी खूप प्रयत्नांनी १९९६ विश्वचषक पुन्हा आशियात आणला. आत्तापर्यंत दालमिया आशियामधील क्रिकेट प्रशासनातील मोठे नाव बनले होते. भारत, श्रीलंका, पाकिस्तान मधील सर्व क्रिकेट प्रशासकांशी त्यांचे चांगले संबंध होते. दालमिया यांनी ओळखले होते की, क्रिकेटचा व्यवसाय या विश्वचषकातून होऊ शकतो आणि त्यातून भरपूर नफा मिळवला जाऊ शकतो.
त्यावेळी दालमिया हे पिलकॉम (Pakistan India Lanka Commission) चे संयोजक होते. दालमिया यांनी तीनही बोर्डांना विश्वचषकाचे प्रसारण हक्क हे खासगी कंपनीला विकण्यासाठी राजी केले. अमेरिकास्थित वर्ल्ड टेल या कंपनीला हे हक्क विकले गेले. बेंगलोरचे मार्क मस्करेन्हास हे या कंपनीचे मालक होते. हे तेच मार्क मस्करेन्हास, ज्यांनी क्रिकेटपटूंना रातोरात नवनविन करार करायला लावून मालामाल केले होते. मस्करेन्हास यांनी तब्बल १० मिलियन इतकी गुंतवणूक केली. त्याकाळी ती खूप मोठी रक्कम होती. परंतु मस्करेन्हास यांनी ही जोखीम पत्करायचे ठरवले.
वाचा- गोष्ट अशा व्यक्तीची, ज्याने सचिनला एका रात्रीत बनवले करोडपती
प्रसारण हक्का पाठोपाठ स्पर्धेच्या प्रमुख प्रायोजकत्वासाठी सिगारेट कंपनी विल्स हिने १२ मिलियन इतकी मोठी बोली लावली. १२ मिलियनच्या बदल्यात क्रिकेट वर्ल्डकपला ‘विल्स क्रिकेट वर्ल्ड कप १९९६’ असे ओळखले जाणार होते.
१९९६ चा विश्वचषक तुफान यशस्वी ठरला. दालमिया यांनी दीड महिन्याच्या काळात भारतीय क्रिकेटला अमाप नफा मिळवून दिला होता. आता दालमिया यांची नजर जागतिक क्रिकेटवर होती.
पुढच्या वर्षी म्हणजे १९९७ मध्ये दालमिया आयसीसीचे अध्यक्ष झाले. १९९७ ते २००० या काळात त्यांनी आयसीसीचा देखील चेहरामोहरा बदलून टाकला.
या काळात आयसीसीला मिळणारा नफा वाटप करण्यास सुरुवात झाली. यामध्ये, निश्चितच भारताला झुकते माप मिळाले. १९९९ च्या विश्वचषकाच्या सामना प्रसारणाचे हक्क १६ मिलियनला विकले गेले. आयसीसी नॉक आऊट टूर्नामेंट म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची मुहूर्तमेढ देखील दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली रोवली गेली.
आयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या अगदी शेवटच्या महिन्यात त्यांनी आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विपणन हक्क ग्लोबल क्रिकेट कॉर्पोरेशन या कंपनीला ५५० मिलियन अमेरिकन डॉलर इतक्या मोठ्या किमतीत विकले. दालमिया यांची आयसीसीतील कारकीर्द देखील तितकीच दिमाखदार राहिली.
बॅडपॅच
आयसीसीमधून परत येताच २००१ मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. दोन दशके बीसीसीआयमध्ये राहिल्यानंतर ते पहिल्यांदाच बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.
२००४ मध्ये दालमिया यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचेच निकटवर्तीय व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा मुलगा रणवीर सिंग महेंद्र हे बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. केंद्रीय मंत्री शरद पवार व रणवीर सिंग या दोघांना समान १५-१५ मते मिळाली. दालमिया यांनी आपले मत रणवीर सिंग यांच्या पारड्यात टाकत त्यांना विजयी केले. रणवीर सिंग हे अध्यक्ष झाले. मात्र, इथूनच दालमिया विरुद्ध पवार हा प्रशासनातील सत्तासंघर्ष जन्माला आला.
पुढच्याच वर्षी, बीसीसीआयची नव्याने निवडणूक घेत शरद पवार यांनी रणवीर सिंग यांना 21 विरुद्ध 10 अशा फरकाने पराभूत करत बीसीसीआयचे अध्यक्षपद पटकावले.
रणवीर सिंग यांना बाजूला केल्यानंतर पवार यांचे पुढील लक्ष होते जगमोहन दालमिया. शरद पवार यांनी बीसीसीआयद्वारे जगमोहन दालमिया यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार केली.
दालमिया यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की, ते बीसीसीआयचे अध्यक्ष असताना इंडियन ओव्हरसीज बँकेत बीसीसीआयचे असलेले चाळीस कोटी रुपये, त्यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या खात्यात हस्तांतरित केले. काही दिवसातच चौकशी होऊन भारतीय क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या जगमोहन दालमिया यांना निलंबित करून बीसीसीआय मधून हद्दपार करण्यात आले.
२००७ मध्ये दालमिया यांनी आपल्यावरील आरोपांना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तिथे बीसीसीआय दालमिया यांच्यावरील आरोप सिद्ध करू शकली नाही. पुढे कोलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करत, क्रिकेट असोसिएशन बंगालची निवडणूक लढविण्याची परवानगी दालमिया यांना दिली. २०१० मध्ये दालमिया यांनी बीसीसीआयवर लावलेला दिवाणी खटला मागे घेतल्यानंतर त्यांचे बीसीसीआयमधील निलंबन देखील रद्द करण्यात आले.
बीसीसीआयमध्ये वापसी
जून २०१३ मध्ये दालमिया बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष झाले. तब्बल आठ वर्षानंतर ते बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसत होते.
२०१३ स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे नाव आल्याने दालमिया यांची निवड झाली होती. २०१४ बीसीसीआयच्या निवडणुकांवेळी अध्यक्षपद पूर्व विभागाकडे जात होते परंतु श्रीनिवासन हे त्या पदासाठी पुन्हा एकदा इच्छुक होते. त्यानुसार त्यांनी जुळवणी देखील केली होती. परंतु न्यायालयाने श्रीनिवासन यांना निवडणूक लढण्यास बंदी घातल्याने ते या शर्यतीतून बाहेर पडले.
पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदाच्या जागेसाठी पवार विरुद्ध दालमिया हा सामना रंगणार होता. दोघांनीही आपापली ताकद लावायला सुरुवात केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी पूर्वेकडील राज्यांमधून आपली उमेदवारी दाखल करण्याची योजना आखली.
दालमिया यांनी क्रिकेट असोसिएशन बंगाल आणि नॅशनल क्रिकेट क्लब या दोन संघटनांची मते आपल्या पारड्यात टाकत या सर्व नाट्याला सुरुवात केली. श्रीनिवासन गटाची मते आपल्या बाजूने करत दालमिया यांनी आपला विजय जवळपास निश्चित केला.
शरद पवार यांनी, अगदी शेवटी शेवटी आपल्या गटाकडून भारतीय जनता पार्टीचे युवा खासदार अनुराग ठाकूर यांच्यासाठी प्रयत्न केले. परंतु यावेळी ठाकूर यांना बहुमतासाठीची मते मिळवण्यात अपयश आले. जगमोहन दालमिया यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
भारतीय क्रिकेटला व्यवसाय शिकवणारे, भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती आणणारे दालमिया पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
२० सप्टेंबर २०१५ रोजी दालमियांचे वयाच्या ७५व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर राहिले. आज याच दालमियांचा मुलगा अविषेक बंगाल क्रिकेट असोशियनशचा अध्यक्ष असून देशातील सर्वोत्तम स्टेडियम म्हणून इडन गार्डनचा पाठीमागेच सन्मान झाला आहे. तसेच या इडन गार्डनच्या एका स्टॅंडला जगमोहन दालमियांचे नाव देण्यात आले असून बीसीसीआयने त्यांच्या नावाने पुरस्कारही सुरु केला आहे.