भारतीय क्रिकेट संघाला एकाहून एक प्रतिभाशाली दिग्गज क्रिकेटपटू लाभले आहेत. कपिल देव, सौरव गांगुली, सुनिल गावसकर, सचिन तेंडूलकर, एमएस धोनी अशा माजी क्रिकेटपटूंच्या योगदानामुळेच भारतीय संघाला क्रिकेटविश्वात मोठा दर्जा मिळाला आहे. या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीनंतरही आजतागायत त्यांच्या आठवणींनी क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले आहे. अशाच एका युवा सिताऱ्याने त्याच्या गोलंदाजीने सर्वच क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली आहे. भविष्यात तो नक्कीच उंच भरारी घेत क्रिकेटरसिकांच्या मनात कायमची आपली छाप सोडेल. हा क्रिकेटपटू म्हणजे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज.
हाच सिराज आज आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खासदिनी नजर टाकूया, सिराजच्या क्रिकेट प्रवासातील काही पैलूंवर…
मोहम्मद सिराजचे वडील चालवायचे रिक्षा
इतर खेळाडूंप्रमाणेच सिराजनेही क्रिकेटपटू बनण्यासाठी खूप मेहनत घेतली. सिराजचा जन्म हैदराबादमध्ये एका गरीब कुटुंबात १३ मार्च १९९४ साली झाला होता. सिराजचे वडील मोहम्मद गौस एक रिक्षा चालक होते. सिराजच्या वडिलांचीच अशी इच्छा होती की, त्याने एक क्रिकेटपटू व्हावे. त्यासाठी त्याच्या वडिलांनी सिराजला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आपल्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सिराज अधिकाधिक सराव करायचा. इतकेच नव्हे, तर रात्रीच्या वेळी त्याला संधी मिळायची, तेव्हाही तो क्रिकेटचा सराव करायला जात होता. सिराजने पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी तो सातवीमध्ये शिकत होता.
सिराजने मेहनत घेतली आणि शेवटी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यात यशस्वी झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करण्याचे फळ त्याला मिळाले आणि २०१७ च्या आयपीएल हंगामात त्याला सनरायझर्स हैदराबादने २.६ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. नंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सहभागी झाली. आता तर बेंगलोर संघाने त्याला २०२२ हंगामासाठी संघात कायम देखील केले आहे.
https://www.instagram.com/p/CWIN77-PwKI/
आयपीएलने बदलले आयुष्य
आयपीएलमध्ये खेळल्यानंतर सिराज ३ नोव्हेंबर २०१७ साली भारतीय टी२० संघात पदार्पण करण्यात यशस्वी राहिला. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सिराजने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. तरीही काही काळापूर्वी त्याच्या गोलंदाजीबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. परंतु, तो या सर्व गोष्टींना मागे टाकत प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला.
शेवटी आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने आयपीएल इतिहासात न बनलेला विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी सिराजने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ३ विकेट्स चटकावले. यासोबतच तो आयपीएल इतिहासात पहिल्यांदा सलग २ निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज बनला.
https://www.instagram.com/p/CNdLMfFDxJa/
बनला बीएमडब्ल्यूचा मालक
आयपीएलमधील कामगिरीमुळे सिराजची क्रिकेट कारकिर्द पुन्हा बहरली आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघात त्याची निवड झाली. या दौर्यातील दुसऱ्या सामन्यातून त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी कारकिर्दीतील अवघ्या दुसऱ्याच सामन्यात तो अविश्वसनीय कामगिरी करत कौतुकास पात्र ठरला. या सामन्यातील दुसर्या डावात ५ विकेट्स घेत त्याने सामन्याचा कायापालट केला होता. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद करत २-१ अशा फरकाने बॉर्डर गावसकर मालिका जिंकली.
या दौऱ्यात सिराजपुढे खूप आव्हाने निर्माण झाली होती. परंतु त्या आव्हानांचा योग्य पद्धतीने सामना करून सिराजने मालिकेत आपले वर्चस्व निर्माण केले. त्याला या मालिकेत वर्णद्वेषी टिकेचा सामना करावा लागला. मात्र त्यातून खचून न जाणता जिद्दीने दमदार प्रदर्शन करत त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले. अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून पुढे जात सिराजने स्वत:ला सिद्ध केले. मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेल्यावर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तरीही सिराजने माघार घेतली नाही.
भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची आपल्या दिवंगत वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियात थांबला आणि त्यांच्या अपेक्षावर खराही उतरला. ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर सिराज सर्वात पहिल्यांदा स्मशानभूमीत गेला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या थडग्यावर (कब्र) पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
https://www.instagram.com/p/CWF7uDmPIJf/
एवढेच नव्हे तर, या २८ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली. अशाप्रकारे ऑटोचालकाच्या मुलापासून ते महागड्या बीएमडब्ल्यूच्या मालकापर्यंतचा प्रवास सिराजने केला.
वाचा –
कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले
वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे