---Advertisement---

मुरलीधरनला ‘फेकी गोलंदाज’ ठरवणारे डॅरेल हेयर

On: शुक्रवार, ऑक्टोबर 2, 2020 7:09 AM
---Advertisement---

कोणताही खेळ असो, त्या खेळाचे योग्य नियमन आणि संचलन करायचे असेल तर पंचांची आवश्यकता भासतेच. क्रिकेटमध्ये देखील पंच कायम, महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपण पाहतो. कोणताच पंच प्रत्येक वेळी अचूक निर्णय देऊ शकत नाही, मात्र, तो अनावश्यक चुका टाळून दर्जेदार पंच निश्चित बनू शकतो. डिकी बर्ड, सायमन टॉफेल, अलिम दार हे असे काही पंच क्रिकेट इतिहासात झाले, ज्यांना कोणताच क्रिकेटप्रेमी नावे ठेवू शकणार नाही. दुसरीकडे, स्टीव डून, डेव्हिड ओरचार्ड व स्टीव बकनर या पंचांनी आपल्या कारकीर्दीत, अनेकदा क्रिकेटप्रेमींच्या शिव्या खाल्ल्या आहेत. ही वादग्रस्त पंचांची यादी, डॅरेल हेअर यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

स्थानिक पातळीवर, हेअर यांनी ऑरेंज आणि मोलांग येथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९७२ मध्ये ते सिडनी येथे स्थलांतरित झाले. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी मॉसमन व नॉर्थ सिडनी क्लब या संघांचे प्रतिनिधित्व केले.

क्रिकेट खेळण्याला लवकरच रामराम ठोकत त्यांनी पंचगिरीकडे लक्ष केंद्रित केले. शेफील्ड शील्ड स्पर्धेत चार हंगाम पंच म्हणून काम पाहिल्यानंतर, १९९२ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ॲडलेड कसोटीत त्यांनी प्रथमता पंच म्हणून काम पाहिले.

हेयर सर्वप्रथम १९९५ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील, मेलबर्न कसोटी दरम्यान प्रसिद्धीझोतात आले. श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या तीन षटकात त्यांनी सात नोबॉल दिले. हेयर यांनी मुरलीधरनवर चेंडू फेकण्याचे आरोप केले होते. तोपर्यंत, २२ कसोटी खेळलेल्या मुरलीधरनवर प्रथमच शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर आयसीसीने स्पष्टीकरण देताना म्हटले की,

“दोन वर्षांपासून, बरेच पंच त्याच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवून होते. त्याच्या गोलंदाजीच्या वैधतेविषयी अनेकांना शंका होती.”

मुरलीधरनच्या गोलंदाजी शैलीची तपासणी केल्यानंतर, त्याचा हात पाच अंशापेक्षा जास्त वाकत असल्याचे दिसून आले. मात्र मुरलीधरनचा हात जन्मजातच तसा असल्याने त्याला निर्दोष घोषित करण्यात आले. पुढे आयसीसीने, सर्व गोलंदाजांसाठी आपला हात १५ अंशांपर्यंत वाकवण्यास परवानगी दिली. १९९९ मध्ये मुरलीधरन प्रकरणात, क्रिकेटला बदनाम केल्याचा ठपका आयसीसीने हेयर यांच्यावर ठेवला. श्रीलंकेविरुद्ध बऱ्याच सामन्यात वादग्रस्त निर्णय देणाऱ्या, हेअर यांना काही लोकांकडून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखत आयसीसीने १९९९ विश्वचषकात हेयर यांना श्रीलंकेच्या एकाही सामन्यात पंच बनवले नाही.

जेव्हा ते ऑस्ट्रेलियामध्ये पंच म्हणून काम करतात तेव्हा ते अनेकदा ऑस्ट्रेलियाला फायदेशीर ठरतील असे निर्णय देत. अनेकांनी तक्रारी केल्यानंतर, २००१ पासून हेयर यांना ऑस्ट्रेलिया सहभागी असलेल्या कोणत्याच सामन्यात पंच म्हणून जबाबदारी मिळाली नाही. आयसीसीने त्यांना पंचांच्या एलिट ग्रुपमधून देखील बाहेर काढले.

२००१ नंतर, हेयर इतर कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहत. २००६ मध्ये हेयर यांच्या नावापुढे पुन्हा एक वाद लागला. ओव्हल येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हेयर आणि सहकारी पंच बिली डॉक्ट्रोव्ह यांनी पाकिस्तानी संघाने बॉल टेम्परिंगमध्ये केले आहे, असा दावा केला. त्यांनी इंग्लंडला पाच पेनल्टी धावा दिल्या आणि नवीन चेंडू पाकिस्तानी गोलंदाजांना देण्याचे ठरवले. याचा निषेध म्हणून चहापानानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानात येण्यास नकार दिला. ३० मिनिटे वाट पाहिल्या नंतर पंचांनी बेल्स काढत, इंग्लंडला विजेता घोषित केले. पाकिस्तानी संघ २५ मिनिटांनंतर मैदानात उतरला, परंतु पंचांनी सांगितले की, बेल्स काढून टाकल्या तेव्हाच खेळ संपला.

आयसीसी, ईसीबी आणि पीसीबीने नंतर कबुली दिली की इंग्लंडला हा सामना बहाल करण्याचा निर्णय क्रिकेटच्या कायद्यानुसार होता. पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल-हक याच्यावर लावलेले बॉल टेम्परिंगचे आरोप चुकीचे ठरले गेले तरी, सामन्यात खरंच बॉल टेम्परिंग झाली होती का? याविषयी, मतमतांतरे आहेत.

२००६ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हेयर यांना आयसीसीने पंच म्हणून नेमले नाही. तसेच, कोणत्याही ही कसोटी खेळणाऱ्या देशांच्या सामन्यात पंचगिरी करण्यावर निर्बंध घातले गेले. फेब्रुवारी २००७ मध्ये हेयर यांनी, ओव्हल कसोटी प्रकरणात सहकारी पंच बिली डॉक्ट्रोव्ह यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे वंशवादाच्या कारणावरून आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दावा दाखल केला. मात्र, पुढील सहा महिन्यातच त्यांनी हा दावा माघारी घेतला. त्यानंतर आयसीसीने, सन्मानपूर्वक त्यांचा समावेश पंचांच्या एलिट पॅनलमध्ये केला. त्यानंतर काही महिने, पंच म्हणून काम पाहिल्यानंतर, त्यांनी ऑगस्ट २००८ मध्ये राजीनामा दिला. भविष्यात आपल्याला, प्रशिक्षक म्हणून काम करायचे आहे, असे कारण त्यांनी दिले होते.

२०१४ मध्ये हेयर आणि हरभजन सिंग यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगला होता. हेयर म्हणाले होते की,

“मुरली, हरभजन व सकलेन मुश्ताक हे कायम अवैद्य शैलीने गोलंदाजी करत. या गोलंदाजांमुळे, अनेक जण चेंडू फेकण्यासाठी प्रोत्साहित झाले. आयसीसीने वेळीच या गोलंदाजांवर कारवाईचा बडगा उभारायला हवा होता.”

हेअर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना हरभजन म्हणाला होता,

“हेयर तुम्ही तुमचे तोंड बंद ठेवा. मी आणि मुरलीने एकाहून अधिक वेळा, गोलंदाजीची शैली तपासून घेतली आहे आणि आयसीसीने आम्हाला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली होती. आमची शैली बरोबरच होती.”

आपल्या सोळा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी, ७८ कसोटी, १३९ वनडे व ६ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. संपूर्ण कारकिर्दीत वादग्रस्त पंच राहिलेल्या हेयर यांच्याशी, निवृत्तीनंतर देखील एक वाद जोडला गेला. २३ ऑक्टोबर २०१७ ला ऑरेंज कोर्टाने त्यांना चोरीच्या आरोपात दोषी ठरवले. जुगार खेळण्याच्या सवयीमुळे आपण हे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले. चोरी केलेली रक्कम १८ महिन्यात परत करण्याच्या अटीवर व पुन्हा चोरी न करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

वाचा- तेराव्या वर्षी पायाची तीन बोटे गेली तरी, तो न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---