स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात क्रिकेट चांगले प्रसिद्ध आहे. इंग्रजांनी आणलेला हा खेळ अगोदर फक्त राजे-महाराजे लोक खेळत असत. त्यानंतर त्या राज्यांच्या संस्थानातील कर्मचारी हा खेळ खेळू लागले. क्रिकेटला मिळत असलेली प्रसिद्धी पाहून सर्वच वर्गातील लोकांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
सन १९८३ ला जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक उंचावला, तेव्हा मात्र क्रिकेट भारतात धर्म आणि खेळाडू देव म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १९८३ च्या त्या विश्वचषक विजयातून अनेकांनी प्रेरणा घेतली आणि पुढे क्रिकेटपटू बनले. अगदी तसंच १९८३ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी बीड जिल्ह्याच्या एका गावातील अकरा वर्षाच्या मुलाने शेजारील लोकांच्या घरात टिव्हीवर पाहिली होती.
कपिल देव यांनी उचललेली ‘ती’ विश्वचषकाची ट्रॉफी पाहून त्या मुलाने देखील भविष्यात क्रिकेटपटू होण्याचे ठरवले होते. तो मुलगा म्हणजे बीडच्या भायळा गावातील एक सामान्य कुटुंबातील ‘संजय बापूसाहेब बांगर.’
भारताने विश्वचषक जिंकला आणि…
बीडसारख्या ग्रामीण भागात लोक कधीतरी फावल्या वेळात क्रिकेट खेळत असत. अशाच फावल्या वेळेत क्रिकेट खेळणारा संजय बांगर चांगले क्रिकेट खेळत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय यांनी शास्त्रोक्त क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून औरंगाबादची वाट धरली. त्याठिकाणी ते महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील संघात निवडले गेले आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी एक सामना देखील खेळला. संजय दर्जेदार क्रिकेट खेळायला मिळावे म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई क्रिकेटमध्ये त्यांच्या बरोबरीची मुले म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी वेगळ्याच दर्जाचे प्रदर्शन करत होती. क्लब स्तरावर बऱ्याच धावा जमवून देखील त्यांची निवड मोठ्या स्पर्धांसाठी होत नव्हती.
रेल्वेकडून खेळण्याचा धाडसी निर्णय
महाराष्ट्र आणि मुंबईकडून वयोगट स्पर्धा खेळल्यानंतरही अपेक्षित संधी न मिळाल्याने बांगर यांनी रेल्वेकडे मोर्चा वळवला. रेल्वे क्रिकेट संघाने त्यांना नोकरी देत आपल्या संघासाठी खेळण्याचे कबूल करून घेतले. सन १९९३-९४ रणजी हंगामात त्यांनी आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले. बांगर रेल्वेसाठी प्रथम फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करत. सलगपणे ७-८ वर्षे त्यांनी रेल्वेसाठी चमकदार कामगिरी केली. सन २००१ च्या रणजी हंगामात बांगर यांच्या कामगिरीच्या जोरावर रेल्वेने अंतिम फेरी गाठली. बडोदा विरुद्ध रेल्वेला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला तरीही, बांगर यांचे विशेष कौतुक झाले. या प्रदर्शनाने राष्ट्रीय निवड समितीची नजर बांगर यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांचा समावेश इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
इंग्लंड विरुद्ध बोर्ड इलेव्हन कडून खेळताना त्यांनी सामन्यात सात बळी मिळवले. बांगर यांनी मोहाली येथे आपले कसोटी पदार्पण केले. त्याच सामन्यात भारतातर्फे बांगर यांच्याव्यतिरिक्त टिनू योहानन आणि इक्बाल सिद्दीकी यांनी देखील पदार्पण केले होते. आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी नागपूर येथे झिम्बाब्वेविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक साजरे केले. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असता, नियमित सलामीवीर वसिम जाफरच्या खराब कामगिरीमुळे हेडिंग्ले कसोटीत त्यांना सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली. वेगवान गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर त्यांनी धीरोदात्तपणे ६८ धावांची झुंजार खेळी केली. गोलंदाजीतही दोन बळी मिळवताना, त्या कसोटीत भारताला विजयी करण्यात त्यांनी खारीचा वाटा उचलला.
भारताने अंतिम फेरीपर्यंत प्रवास केलेल्या २००३ विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. मात्र, त्यांना एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. बांगर हे भारतीय संघासाठी ‘लकीचार्म’ राहिले. त्यांनी खेळलेल्या १२ कसोटीपैकी दहा कसोटीत भारताने विजय साजरा केला होता. त्यांना भारताकडून अवघे १५ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. सन २००४ न्यूझीलंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे त्यांची पुन्हा कधीही भारतीय संघात निवड झाली नाही.
देशांतर्गत क्रिकेटमधील ‘दिग्गज’
राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतरही बांगर यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी चालू ठेवली. त्यांनी रेल्वेचे कर्णधारपद देखील भूषवले. बांगर यांच्या नेतृत्वात रेल्वेने दोन वेळा रणजी ट्रॉफी, दोन वेळा इराणी ट्रॉफी आणि एकदा विजय हजारे ट्रॉफीवर कब्जा केला. १६३ प्रथमश्रेणी सामन्यात यांच्या नावे आठ हजार धावा आणि तीनशेहून अधिक बळी आहेत. विजय हजारे यांच्यानंतर सहा हजार धावा व २०० बळी मिळवणारे ते पहिले क्रिकेटपटू होत. बांगर हे अष्टपैलू असले तरी ते स्वतःला एक गोलंदाज मानत. मात्र, त्यांनी अष्टपैलू म्हणून स्वतःची वेगळी छाप पाडली.
होय, बांगर आयपीएलसुद्धा खेळलेत
बऱ्याच जणांना माहित नसेल परंतु, संजय बांगर यांनी आयपीएलचे सुरुवातीचे दोन हंगाम खेळाडू म्हणून खेळले आहेत. पहिल्या हंगामात त्यांनी डेक्कन चार्जर्स तर दुसऱ्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले.
विराट, रोहित यांच्या कामगिरीचे श्रेय बांगर यांना जाते
खेळाडू म्हणून कारकीर्द थांबवत त्यांनी, २०१० मध्ये भारत अ संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यानंतर आयपीएलमधील कोची टस्कर्स संघाच्या प्रशिक्षक गटात त्यांचा समावेश होता. २०१४ आयपीएलमध्ये बांगर किंग्स इलेव्हन पंजाबचे फलंदाजी प्रशिक्षक बनले. हंगामाच्या मध्यात त्यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. याच हंगामात पंजाबने अंतिम फेरी गाठली होती.
बांगर यांच्या आयपीएलमधील प्रशिक्षणाच्या कामगिरीने प्रभावित होत, बीसीसीआयने त्यांना भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवले. २०१६ मध्ये झिंबाब्वे मालिकेसाठी त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे मोठे फलंदाज आपल्या फलंदाजीतील सुधारणेसाठी बांगर यांना श्रेय देतात. बांगर यांच्याच काळात भारतीय संघातील तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करू लागले होते. बांगर हे सलग पाच वर्ष भारतीय संघाशी जोडले गेलेले. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, त्यांना सहाय्यक प्रशिक्षक पदावरून कमी करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून बांगर यांची कामगिरी समाधानकारक असली तरीही, त्यांना वगळल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.
सध्या बांगर हे स्टार स्पोर्ट्स या खासगी वाहिनीसाठी समालोचनाचे काम करतात. त्यांनी औरंगाबादला काही शेती देखील घेतली आहे. क्रिकेटनंतर पूर्णवेळ शेती करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे.
वाचा-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई