इंग्लंडने २०१९ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि ४४ वर्षात प्रथमच इंग्लिश जनता विश्वचषकाचा आनंद साजरा करू शकली. विश्र्वचषक इंग्लंडने जिंकला असला तरी, बरेचसे खेळाडू मूळ इंग्लिश नव्हते. कोणी पाकिस्तान, कोणी द. आफ्रिका तर कोणी झिम्बाब्वे वंशाचे होते. महत्त्वाचे म्हणजे कर्णधार मॉर्गन हा सुद्धा मुळचा आयर्लंडचा खेळाडू होता. एका आयरिश खेळाडूने इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले असे देखील काहींनी इंग्लंडला हिणवले.
खरंतर, मॉर्गनने २००७ विश्वचषकात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो इंग्लंडसाठी खेळू लागला होता. याउलट असा एक खेळाडू होता जो, प्रथमतः आयर्लंडसाठी क्रिकेट खेळला नंतर इंग्लंडसाठी खेळला आणि पुन्हा आयर्लंडसाठी खेळून निवृत्त झाला. आयर्लंड, इंग्लंड आणि परत आयर्लंड असा प्रवास करणारा तो क्रिकेटपटू म्हणजे एड जॉयस. आज जॉयसचा ४२ वा वाढदिवस.
डब्लिन येथे जन्म झालेला एड एका क्रिकेट खेळणाऱ्या परिवारातून आला होता. त्याच्या व्यतिरिक्त कुटुंबातील पाच जणांनी आयर्लंडसाठी क्रिकेट खेळले आहे. त्याचे दोन भाऊ गुस, डोम आणि जुळ्या बहिणी इसोबेल आणि सेसिलिया आयर्लंडचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. सध्या, इसोबेल आयरिश महिलांच्या संघाचे नेतृत्व करीत आहे. त्याची सावत्र आई मॉरीनने २००२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
ट्रिनिटी कॉलेजसाठी वेगवेगळ्या स्तरावर क्रिकेट खेळल्यानंतर जॉयसने १९९९ मध्ये मिडलसेक्ससाठी काउंटी पदार्पण केले आणि २००० मध्ये एनबीसी डेनिस कॉम्पटन पुरस्कार जिंकला. २००२ पासून तो मिडलसेक्स संघाचा नियमित सदस्य बनला. या वर्षी त्याने ५१ ची सरासरी राखत चार शतके केली. जॉयसने २००४ च्या काउंटी हंगामात ओवेस शहाच्या जागी त्याला मिडलसेक्स काउंटीचे कर्णधारपद भूषवले.
काउंटीमधील व आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये आयर्लंडसाठी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचे नागरिकत्व घेऊन तो इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र ठरला. २००६ मध्ये इंग्लंडसाठी आपल्या मायदेशाविरुद्धच त्याने पदार्पण केले. २००६-२००७ ऍशेज मालिकेपूर्वी जॉयसची निवड इंग्लंडच्या कसोटी संघात केली गेली. निवड समितीचे अध्यक्ष डेव्हिड ग्रॅव्हनी यांनी मार्कस ट्रेस्कोथिकच्या जागी ही निवड केली होती. अनुभवी ओवेस शाह आणि रॉबर्ट की यांना डावलून जॉयसला संधी देण्यात आल्यामुळे ग्रॅव्हनी यांच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. परंतु, जॉयसला मालिकेत एकाही कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
२००७ विश्वचषकाच्या ऐन आधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे त्याने खेळलेली १०७ धावांची शतकी खेळी त्याला विश्वचषकाचे तिकीट देऊन गेली. विश्वचषकात केनिया व कॅनडा यांच्याविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळ्या केल्या. न्यूझीलंड व आयर्लंड विरुद्धचा खराब कामगिरीमुळे त्याला सुपर एटच्या पहिल्या सामन्यानंतर संधी मिळाली नाही. २००९ मध्ये जेव्हा तो ससेक्सकडून जोरदार प्रदर्शन करत होता, त्यावेळी त्याने इंग्लंड संघात पुनरागमनाची आशा धरली होती. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि मार्च २०१० मध्ये तो पुन्हा आयर्लंडचे प्रतिनिधित्व करण्याचा विचार करू लागला.
जॉयसने जेव्हा पुन्हा आयर्लंडसाठी खेळण्याचे ठरवले तेव्हा, पुन्हा त्याला आयर्लंडचे नागरिकत्व घेऊन, चार वर्षानंतर विश्वचषक खेळण्यासाठी पात्र होण्याची अट होती. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने विनंती केल्यानंतर, आयसीसीने त्याला व न्यूझीलंडचा माजी खेळाडू हामिश मार्शल यांना २०११ चा विश्वचषक आयर्लंडकडून खेळण्याची परवानगी दिली. त्यानंतर जॉयस कायमस्वरूपी आयर्लंड संघाचा प्रमुख खेळाडू बनला.
त्याने २०११ व २०१५ अशा दोन विश्वचषकात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले. इओन मार्गननंतर, दोन वेगवेगळ्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज बनला. २०१८ मध्ये आयर्लंडने खेळलेल्या पहिल्या कसोटीत तो आयर्लंड संघाचा सदस्य होता.
२०१९ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी, जॉयसने ७८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व १८ टी२० सामने खेळताना अनुक्रमे २,६२२ व ४०५ धावा काढल्या. निवृत्तीनंतर लगेचच, जॉयसला आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा संचालक बनवण्यात आले. गेल्या एक वर्षापासून तोही जबाबदारी निग्रहपूर्वक पार पाडत आहे.
वाचा-अविश्वसनीय गुणवत्ता असूनही संपूर्ण कारकीर्दीत वादग्रस्त राहिलेला अंबाती रायडू