क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या धर्मासमान मानला जातो. भारतीय क्रिकेट इतिहासात आजपर्यंत एकापेक्षा एक महान खेळाडूंनी आपले योगदान दिले आहे. भारतीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंविषयी बोलायचे झाल्यास दर्जेदार म्हणावे असे, अगदी बोटावर मोजण्याइतकेच अष्टपैलू खेळाडू होऊन गेले आहेत.
“आबिद अली, कपिल देव, मनोज प्रभाकर, नवज्योतसिंह सिद्धू हे असे काही खेळाडू होते, जे फलंदाजी तसेच मध्यमगती गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवत असत. परंतू, त्यानंतरच्या काळात असे अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला अत्यंत कमी मिळाल्याचे दिसत आहे.”
काही वर्षांपूर्वी इरफान पठाण आणि त्याचा मोठा भाऊ युसूफ पठाण यांनी अष्टपैलू म्हणून भारताकडून चांगलेया खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, त्यांच्या खेळात सातत्य राहिले नाही. परिणामी, त्यांना लवकरच भारतीय संघातून वगळण्यात आले.
मात्र, आता संघाला प्रदिर्घ कालावधीनंतर एक असा अष्टपैलू मिळाला आहे, जो सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आक्रमक फटके खेळू शकतो. तसेच, मध्यमगती गोलंदाजी करत संघाला पाचव्या गोलंदाजाचा पर्यायही मिळवून देऊ शकतो. तो खेळाडू म्हणजे हार्दिक हिमांशु पांड्या, हा होय.
हलाखीची परिस्थिती आणि किरण मोरेंची साथ…
हार्दिकचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातच्या सूरत येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव हिमांशु आणि आईचे नाव नलिनी पांड्या आहे. हार्दिकचे वडील क्रिकेटप्रेमी असल्याने ते हार्दिकला लहान असल्यापासूनच सोबत घेऊन क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी जात असत. हिमांशू हे सुरत येथे गाड्यांचा छोटासा व्यवसाय करत. मात्र, व्यावसायात मोठे नुकसान झाल्याने त्यांनी सुरत मधील सर्व काही विकून वडोदरा गाठले. शाळेत अजिबात रस नसल्याने हार्दिकने नववीनंतर शाळेला रामराम ठोकला.
वडोदरा येथे आल्यानंतर हार्दिक आणि त्याचा मोठा भाऊ कृणाल हे लहान-लहान स्पर्धांमध्ये खेळत. दोघेही भाऊ अत्यंत आक्रमक फलंदाजी करत. अशाच एका स्पर्धेत भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांची पांड्या बंधूंवर नजर पडली. मोरे यांनी त्या दोघांना आपल्या अकादमी येण्यास निमंत्रित केले. मोरे यांच्या अकादमीत प्रवेश घेण्यासाठी त्या दोघांकडे पुरेसे पैसे नव्हते. मोरे यांनी त्या दोघांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. मोरे यांच्या अकादमीत सहभागी झाल्यानंतर दोघांचा खेळ कमालीचा बदलला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन्ही भाऊ मॅगी खाऊन दिवस काढत.
स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने पांड्या बंधूंचे नाव बडोदा क्रिकेट वर्तुळात चांगले गाजत होते. सन २०१३ मध्ये त्याची निवड बडोद्याच्या वरिष्ठ संघात झाली. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत हार्दिक लेगस्पिन गोलंदाजी करत असत. मात्र, बडोद्याचे प्रशिक्षक सनतकुमार यांनी त्याला मध्यमगती गोलंदाजी करण्यास सांगितले. तसेच, हार्दिककडे खेळण्यासाठी चांगली बॅट नसल्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू व बडोद्याचा कर्णधार इरफान पठाणने त्याला दोन बॅट्स दिल्या होत्या.
मुंबई इंडियन्सने हार्दिकला मोठे केले
हार्दिकच्या आक्रमक फलंदाजीवर सर्वप्रथम फिदा झाले ते भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राईट. सन २०१४ च्या मुश्ताक अली ट्रॉफीत हार्दिकने मुंबई विरूद्ध ५७ धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्यावेळी जॉन राईट मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक होते. त्यांनी आयपीएलच्या लिलावात हार्दिकला १० लाख रुपयांच्या मूलभूत किमतीत मुंबई इंडियन्स संघात निवडले. हे दहा लाख रुपये मिळण्याआधी, हार्दिकला एक सामना खेळण्यासाठी ४०० रुपये मिळत.
मुंबई इंडियन्सशी जोडले गेल्यानंतर, हार्दिकला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ८ चेंडूत २१ धावा काढत सर्वांची वाहवा मिळवली. संपूर्ण हंगाम त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने गाजवला. केकेआर विरुद्ध त्याने ३१ चेंडूत ६१ धावा करत मुंबईला एकहाती सामना जिंकून दिला. अंतिम फेरी देखील, पवन नेगीच्या एका षटकात त्याने २० धावा काढत सामन्याचे चित्र पालटले. त्यावेळी भारताचा सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर याने म्हटले होते की, ‘हार्दिक पुढील एक दीड वर्षात भारतीय संघात असेल.’
… आणि सचिनचे शब्द खरे झाले
आयपीएलनंतर लगेच त्याचा समावेश बडोद्याच्या रणजी संघात करण्यात आला. २०१६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून हार्दिकने टी२० पदार्पण केले. त्याच्या दुसऱ्या सामन्यात, संघ व्यवस्थापनाने त्याला धोनी आणि युवराज यांच्या आधी फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याने देखील १४ चेंडूत २७ धावा काढत हा निर्णय सार्थ केला. त्याच वर्षीच्या, आशिया चषक आणि टी२० विश्वचषक संघात देखील हार्दिकला स्थान देण्यात आले. बांगलादेश विरुद्ध साखळी सामन्यात अखेरच्या तीन चेंडूवर दोन बळी घेत त्याने भारताला हा सामना जिंकून दिला होता.
टी२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असताना, त्याला न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली गेली. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने इमाद वसिमला सलग तीन षटकार खेचले.
अंतिम सामन्यात भारताचा डाव ५४-५ असा घसरला असताना, हार्दिकने ४३ चेंडूत ७६ धावांची वादळी खेळी केली होती. २०१६ मध्ये हुकलेली कसोटी पदार्पणाची संधी त्याने जुलै २०१७ मध्ये साधली. पहिल्याच मालिकेत त्याने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. मिलिंद पुष्पकुमाराच्या एका षटकात २६ धावा फटकाविण्याचा पराक्रम त्याच्या नावे आहे.
वादग्रस्त पण हवाहवासा हार्दिक…
आपल्या बिंधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध असलेला हार्दिक अनेकदा याच बिंधास्त वागण्यामुळे अडचणीत आला आहे. असभ्य वर्तनामुळे त्याची बडोद्याच्या १७ वर्षाखालील संघात निवड झाली नव्हती. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात स्त्रियांविषयी वादग्रस्त टिपणी केल्यामुळे केएल राहुलसोबत हार्दिकवर दोन मालिकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या घटनेवर बराच वाद झाल्यानंतर, हार्दिकने सर्वांची माफी मागत वर्तणूक सुधारण्याचे आश्वासन देऊन वादावर पडदा टाकला.
हार्दिक सोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल हादेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्सला तीन वेळा आयपीएल विजेते बनवण्यास मदत केली आहे. कृणाल हादेखील दोनवेळा मुंबईसाठी आयपीएल विजेता ठरला आहे. २०१५ मध्ये १० लाख रुपयांच्या किमतीत मुंबईच्या संघात दाखल झालेल्या हार्दिकला २०१८ आयपीएलसाठी तब्बल ११ कोटी रुपये देण्यात आले होते. हार्दिकने अभिनेत्री नाताशा स्टॅकोविक हिच्याशी लग्न केल्यानंतर, या दाम्पत्याला अगस्त्य नावाचा पुत्र देखील लाभला आहे.
मैदानावरील हार्दिकचा वावर हा कायमच उत्साहाने भरलेला आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेल्या हार्दिकची आजवरची जीवनगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.
वाचा-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई