भारतीय संघ २०१६ च्या जानेवारी महिन्यात पाच वनडे व तीन टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. आकडेवारीच्या हिशोबाने वनडे मालिका रेकॉर्डब्रेक ठरली होती. पाच सामन्यात तब्बल ३,१५९ धावा दोन्ही संघाकडून काढल्या गेल्या होत्या. प्रत्येक सामन्यात ३०० धावांचे आव्हान लीलया पार केले गेले होते. पहिले चार सामने ऑस्ट्रेलियाने सहजरित्या जिंकले. अखेरचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार होता. ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत होता तर भारतापुढे व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान.
धोनीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने एकदिवसीय पदार्पण केले. पहिल्या चार सामन्या प्रमाणेच या सामन्यातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी शतके झळकावत ५० षटकात ३३० धावा फटकावल्या. भारताचा व्हाईटवॉश पक्का वाटत होता. मात्र, भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी १२३ धावांची सलामी देत, सामना जिंकण्याची आशा निर्माण केली. शिखर ५६ चेंडूत ७८ भावा काढून बाद झाल्यावर भरवशाचा विराट कोहली अवघ्या ८ धावा काढत तंबूत परतला.
चौथ्या क्रमांकावर आपला अवघा सातवा सामना खेळत असलेला मनीष पांडे उतरला. जम बसलेल्या रोहित शर्माला साथ देत मनीषने पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायला सुरुवात केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाची अनुभवी गोलंदाजी चांगली फोडून काढली. रोहित शर्मा दुर्दैवी ठरला व ९९ धावांवर बाद झाला. मनीषला साथ देण्यासाठी कर्णधार धोनी मैदानात उतरला तेव्हा विजयासाठी अजूनही १०० धावांची गरज होती. धोनीने एक टोक सांभाळत मनीषला फटकेबाजी करण्याची मुभा दिली. ९४ धावांची भागीदारी करत दोघांनी भारताला विजयाच्या नजीक नेले.
अखेरच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना मार्शने पहिला चेंडू वाईड टाकला. पुढच्याच चेंडूवर धोनीने उत्तुंग षटकार खेचत, ऑस्ट्रेलियाला सामन्यातून जवळपास बाहेर केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर सामन्यात नाट्य घडले. डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देत धोनी बाद झाला. या सर्वात, ९८ धावांवर खेळत असलेला मनीष स्ट्राइकवर आला. आपले पहिले शतक तसेच भारताला मालिकेतील पहिला विजय मिळवून देण्याचा दबाव त्याच्यावर होता. मार्शने टाकलेला तिसरा चेंडू थर्ड मॅनला चौकारासाठी मारत त्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. पुढच्याच चेंडूवर दोन धावा घेत भारताला विजयी करत व्हाईटवॉश टाळला. भारताला धोनीच्या साथीला हव्या असलेल्या दुसऱ्या फिनिशरची जबाबदारी निभावण्यासाठी मनीष पांडे मिळाला होता.
उत्तराखंडमधील नैनिताल येथे १० सप्टेंबर १९८९ रोजी मनीषचा जन्म झाला. वडील भारतीय सैन्यात कर्नल होते, त्यामुळे त्यांची सातत्याने बदली होत. वडिलांप्रमाणे आपणही सैन्यात जायचे असे मनीषने लहानपणी ठरवले मात्र वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. मनीषचा जन्म नैनिताल येथे झाला तरी त्याने नाशिकमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. राजस्थानमध्ये लीग क्रिकेट खेळला आणि त्यानंतर कर्नाटकात स्थायिक झाला, जिथे त्याने आपले बहुतांशी बालपण घालवले.
नऊ वर्षांच्या वयातच मनीषने बंगळूरमधील माजी भारतीय यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने एकदा म्हैसूरच्या संघाविरुध्द अवघ्या ४० चेंडूत विस्फोटक शतक काढले. तेथूनच मनीषच्या क्रिकेट प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
मनीषचा खेळाडू म्हणून इतक्या वेगाने विकास झाला की तो अवघ्या १६ व्या वर्षी दिग्गजांचा समावेश असलेल्या कर्नाटक रणजी संघात खेळू लागला. ज्याला आदर्श मानायचा त्या राहुल द्रविडने त्याच्यातील गुणवत्ता ओळखली व रणजी तसेच लिस्ट ए सामन्यात त्याला अधिकाधिक संधी दिली. त्यानेही, मिळालेल्या संधीचे सोने करत धडाकेबाज खेळ्या केल्या.
२००८ मध्ये मलेशियात आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या संघात, रवींद्र जडेजा, सौरभ तिवारी, सिद्धार्थ कौल हे खेळाडू होते ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याच विश्वचषकातील स्टीव स्मिथ, केन विलियमसन, ख्रिस वोक्स, कुसल परेरा, ट्रेंट बोल्ट हे खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत.
२००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलमध्ये त्याची मुंबई इंडियन्स संघात निवड करण्यात आली मात्र तेथे त्याला संधी न मिळाल्याने तो पुढच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात दाखल झाला. द. आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात मनीषने डेक्कन चार्जर्स विरुद्ध शतक झळकावण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय म्हणून त्याची कायमस्वरूपी नोंद झाली.
मनीषला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कोलकत्ता नाइट रायडर्स संघाकडून खेळताना. २०१४-२०१७ अशी चार वर्ष त्याने केकेआरकडून गाजवली. २०१४ आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरला २०० धावांचे आव्हान मिळाले असताना, मनीषने ५० चेंडूत ९४ धावांची खेळी करत केकेआरला दुसरे विजेतेपद मिळवून दिले.
विराट कोहली, रवींद्र जडेजा व सौरभ तिवारी हे युवा संघातील सहकारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असले तरी चांगली कामगिरी करूनही मनीषला भारतीय संघात निवडले जात नव्हते. जवळपास, सहा वर्ष वाट पाहिल्यानंतर २०१५ च्या झिम्बाब्वे दौर्यावर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक ठोकून त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये विराट कोहली व बाबर आझम यांच्यानंतर मनीषची सरासरी सर्वोत्तम आहे. टी२० क्रिकेटमध्ये मनीष भारतीय संघाचा ‘लकी चार्म’ म्हणून ओळखला जातो. मनीषने आतापर्यंत खेळलेल्या ३७ टी२० सामन्यात भारताने एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सध्याच्या अव्वल पाच क्षेत्ररक्षकांत त्याचा समावेश होतो.
२०१६ च्या टी२० विश्वचषकात तसेच २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी संघात देखील त्यात समावेश होता. २०१८ आयपीएल खराब गेल्याने तो काही काळ क्रिकेटपासून दूर झाला. सहा महिन्यांची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन करत त्याने कर्नाटकला विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. २ डिसेंबर २०१९ रोजी दक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्यासमवेत मनीष विवाह बंधनात अडकला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, क्रिकेट विषयीची आपली जबाबदारी पार पाडत, कर्नाटकचे नेतृत्व करताना त्याने सलग दुसऱ्यांदा कर्नाटकला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मिळवून दिली.
मनीष नियमितपणे भारतीय संघासोबत असला तरी संघात जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. पुरेसा अनुभव पाठीशी असल्याने, भविष्यात मनीष भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू बनेल यात शंका नाही.
वाचा-
-गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर
-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला
-तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…