---Advertisement---

तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 23, 2020 5:39 PM
---Advertisement---

इक्बाल अब्दुल्ला.. तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हाला हे नाव चांगलेच परिचित असेल. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळलेला हा खेळाडू, मुंबई संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारून गेला. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून या मुलाला ‘तू भारताकडून खेळशील’ असे स्वप्न दाखवून नौशाद खान या क्रिकेट प्रशिक्षकाने मुंबईत आणले. सात वर्ष त्याला आपल्या घरात जागा दिली. २२५ स्क्वेअर फुटाच्या त्या घरात नौशाद, त्यांची दोन मुले आणि पत्नी यांच्यासमवेत इक्‍बाल राहू लागला होता. नौशाद इक्बालवर मेहनत घेत होते. नौशाद व इक्बाल यांच्या मेहनतीचे चीज झाले. इक्बाल भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघातून विश्वचषक खेळला. आयपीएलचे हंगाम गाजवले. मुंबईकडून खेळला आणि कर्णधारदेखील झाला.

एके दिवशी नौशाद यांना काहीतरी अडचण आली आणि त्यांनी इक्बालकडे मदत मागितली. इक्बालने आधी नकार दिला. शब्दाने शब्द वाढला आणि इक्‍बाल बोलला, “मी आज जे काही आहे, ते स्वतःच्या मेहनतीवर आहे. तुमचे त्यात योगदान काय ? तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर तुमच्या मुलांना क्रिकेटपटू बनवून दाखवा.”

नौशाद यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ज्या मुलाला पोटच्या मुलासारखे सांभाळले, त्याच्याकडून ही अपेक्षा त्यांनी ठेवली नव्हती. हे सर्व घडत असताना, नौशाद यांचा मोठा मुलगा ९-१० वर्षाचा होता. त्याने हे सर्व संभाषण ऐकले. इक्बालने दिलेले आव्हान बाप-लेकाने स्वीकारले आणि सुरु झाला भारतातील सर्वात प्रतिभावंत खेळाडू तयार होण्याचा प्रवास.

पूर्ण खान कुटुंब लागले ‘ते’ चॅलेंज पूर्ण करण्यामागे

नौशाद हे पश्चिम रेल्वेत तृतीय श्रेणी कामगार. सोबतच, मुंबईत लहान मुलांना क्रिकेट प्रशिक्षण ही देतात. इतर मुलांप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाला देखील क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. आझाद मैदानावर सर्फराज आपल्या बापाच्या अपमानाचा बदला घ्यायच्या उद्देशाने खेळू लागला. रक्तातच क्रिकेट असल्याने त्याला नवे काही शिकवावे लागले नाही. चेंडू पुढ्यात पडला की तो फटकावायचा, इतकेच त्याला माहित. नौशाद यांनीदेखील त्याचा नैसर्गिक खेळ जास्त न बदलता त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. आझाद मैदानावर खेळत असलेल्या सर्व मुलांत, सर्फराज सर्वात आक्रमक होता. इतर मुलांपेक्षा त्याची कहाणी देखील वेगळीच होती ना ?

मोठ्या सर्फराजला पाहून, नौशाद यांचा लहान मुलगा मुशीर हा देखील क्रिकेटकडे वळाला. या पठ्ठ्याने तर वयाच्या आठव्या वर्षीच युवराज सिंहला बोल्ड केले. भाऊ फलंदाज असला तरी हा मात्र गोलंदाज झाला. आपली दोन्ही मुले क्रिकेटपटू बनण्यासाठीच जन्मलीत, याची खात्री नौशाद यांना पटली आणि त्यांचाही उत्साह वाढला. पावसाळ्यात मुलांना मैदानावर जाता येत नसल्याने त्यांनी, अंगणातच सिमेंटची खेळपट्टी बनवली. ज्यामुळे, सर्फराजच्या आक्रमक फलंदाजीला अजून रंग चढला. क्रिकेटबद्दल सरफराज इतका भावनिक झाला होता की, तो शाळेत जात नसे. खासगी शिक्षक घरी येऊन त्याची शिकवणी घेत.

सचिनचा विश्वविक्रम मोडत बनवली ओळख

सर्फराज हळूहळू मुंबईच्या वयोगट क्रिकेटमध्ये चमकू लागला होता. सन २००९ च्या हॅरीस शिल्ड स्पर्धेमुळे त्याचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. यासाठी कारणही तितकेच खास होते. अवघ्या बारा वर्षाच्या सर्फराजने, सचिन तेंडुलकरचा ४५ वर्ष जुना विक्रम मोडत ४२१ चेंडूत वैयक्तिक ४३९ धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती. रिझवी स्प्रिंगडेल स्कूलकडून खेळताना त्याने या खेळीत ५६ चौकार आणि १२ षटकार मारले होते. अशीच दिमाखदार कामगिरी तो सातत्याने करू लागला. ज्यामुळे, लवकरच त्याचा समावेश मुंबईच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात झाला.

अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपमधील उल्लेखनीय

मुंबईच्या संघात समावेश झाला. यावर मात्र तो तितकासा खुश नव्हता. त्याला आता भारतीय संघाकडून २०१४ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक खेळायचा होता. भारतीय युवा संघ २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना सर्फराजने ६६ चेंडूत १०१ धावांची खेळी करत विश्वचषकातील जागेवर कब्जा केला. त्याचे प्राथमिक लक्ष पूर्ण झाले होते.

युएईत झालेल्या २०१४ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. मात्र, सर्फराजची कामगिरी चांगली होती. सहा सामन्यात ७० च्या लाजवाब सरासरीने त्याने २११ धावा उभारल्या होत्या. याच प्रदर्शनामुळे, अगदी काही दिवसात झालेल्या आयपीएल लिलावात, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला ५० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. याच वर्षी त्याने मुंबईसाठी रणजी पदार्पण देखील केले.

गेल आणि विराटकडून कौतुक करवून घेणारा ‘पांडा’

त्याच वर्षी त्याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. चेन्नई सुपर किंग विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच त्याने विक्रम केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू होण्याचा मान त्याला मिळाला होता. पहिल्या सामन्यात अकरा धावा केल्यानंतर, पुढील दोन सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या चौथ्या सामन्यात मात्र त्याने संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. शेन वॉटसन, जेम्स फॉकनर, धवल कुलकर्णी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरूद्ध तुफानी फटकेबाजी करत त्याने २१ चेंडूत ४५ धावा तडकावल्या. या खेळीनंतर, विराट कोहलीने त्याला दिलेली अनोखी शाबासकी, सर्वानी पाहिली.

आयपीएलमधील अनुभवाचा फायदा त्याने पुन्हा २०१६ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात उचलला. बांगलादेशात झालेल्या स्पर्धेत, ३५५ धावांसह तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा आला. त्याने खेळलेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यात त्याने अर्धशतकाची वेस ओलांडली होती. आजही स्पर्धेत इतिहासात, ७ अर्धशतके झळकवणारा तो एकटा खेळाडू आहे.

आधीपासूनच फॉर्मात असलेल्या सर्फराजने, आयपीएल २०१६ चा पहिलाच सामना गाजवला. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १० चेंडूत ३५ धावांची विस्फोटक खेळी केली. त्यावेळी भारताचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या, भुवनेश्वर कुमारच्या एकाच षटकात त्याने २६ धावा लुटल्या होत्या. टी२० क्रिकेटचा सर्वोत्तम खेळाडू असणाऱ्या ख्रिस गेल त्याला लाडाने, ‘पांडा’ म्हणतो. त्याचे कौतुक करताना गेलने म्हटले, “माझी सर्फराजवर नजर असेल. भविष्यातील तो सर्वोत्कृष्ट टी२० खेळाडू बनू शकतो.”

त्या हंगामात तंदुरुस्तीमुळे त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल २०१७ हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आरसीबी व्यवस्थापनाने २०१८ आयपीएलसाठी विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्यासमवेत तब्बल पाच कोटी रुपये देत, सर्फराजला आपल्या संघात कायम ठेवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

कारकिर्दीतला छोटासा बॅडपॅच

मुंबईकडून रणजीचा एक हंगाम खेळल्यानंतर तो, आपले मुळ राज्य असलेल्या, उत्तर प्रदेशकडून खेळण्यासाठी गेला. त्याचा हा निर्णय पूर्णतः उलटा पडला. दोन वर्ष उत्तर प्रदेशसाठी खेळताना, त्याची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्याने पुन्हा मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला. बीसीसीआयच्या नियमानुसार, त्याला एक वर्ष मुंबईकडून खेळता येणार नव्हते. दरम्यानच्या काळात, २०१८ आयपीएलनंतर आरसीबीने त्याच्यासोबत करार वाढवला नाही. पुढे २०१९ आयपीएलच्या लिलावात त्याला चांगली बोली मिळून तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात सामील झाला.

नव्या तंत्रासह आलेला नवा सर्फराज

ज्यावेळी सर्फराज मुंबईसाठी खेळण्यास पात्र नव्हता, त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रशिक्षणासाठी खास सोय केली. आपल्या घराच्या अंगणात बनवलेल्या खेळपट्टीवर तो सराव करू लागला. नौशाद यांनी त्याच्यातील सर्व बारीक-सारीक कमजोरीवर काम करणे सुरू केले. याचा एक परिणाम लवकरच दिसला. सन २०१९-२०२० रणजी हंगामात त्याने आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम रचले. उत्तर प्रदेश विरुद्धच केलेली त्याची त्रिशतकी खेळी त्याच्यातील बदलाची साक्ष देत होती. सोबतच त्याने दोन शतके देखील ठोकली. आता, आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो पुन्हा, किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करत खेळत आहे.

सर्फराजने आत्तापर्यंत तरी आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला योग्यरित्या घेतला आहे. ज्या इक्बाल अब्दुल्लाने त्याच्या वडिलांसोबत कृतघ्नता दाखवली होती तो इक्बाल अब्दुल्ला सर्फराज आल्यापासून गायब झाला आहे. आता सर्फराजचे एकच लक्ष आहेत ते म्हणजे भारतीय संघाची निळी जर्सी अंगावर चढवणे. ज्या दिवशी सर्फराज ही जर्सी अंगावर चढवेल तेव्हा, एका बापाच्या अपार मेहनतीचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही.

वाचा- नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---