आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट सुरू होऊन, आता जवळपास ८० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, महिला क्रिकेटला खरी प्रसिद्धी मिळाली ती २००० नंतरच. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व भारतात महिला क्रिकेट पसंत केले जाऊ लागले. प्रत्येक देशांत काही अत्यंत प्रतिभावान महिला क्रिकेटपटू पुढे आल्याने, महिला क्रिकेटचा दर्जा दिवसेंदिवस चांगला होऊ लागला. सध्या पुरुष क्रिकेटप्रमाणे महिला क्रिकेट सामने पाहण्यासाठी, क्रिकेट चाहते मैदानावर गर्दी करतात. गतवर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी२० विश्वचषकात गर्दीचे अनेक उच्चांक मोडले गेले.
सध्या महिला क्रिकेटमध्ये एलिसा पेरी, एलिसा हिली, हिदर नाईट, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, चमारी अटापटू, सोफी डिवाइन, सना मीर या खेळाडू अनेक तरुणींच्या आदर्श झाल्या आहेत. या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाने क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे. वरील वरिष्ठ व अनुभवी खेळाडूंव्यतिरिक्त भारताची शेफाली वर्मा, जेमीमा रॉड्रिग्ज, द. आफ्रिकेची लॉरा वाल्वर्ट, वेस्ट इंडीजची डायंड्रा डॉटीन, बांगलादेशची जहानारा आलम या तरुण महिला क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करत आपापल्या संघांसाठी प्रमुख खेळाडू बनल्या आहेत. महिला क्रिकेटचा पाठपुरावा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारले की, “महिला क्रिकेटमध्ये भविष्यात सर्वात मोठी खेळाडू कोण असेल?” तर त्या व्यक्तीचे उत्तर असते, “न्यूझीलंडची एमेलिया कर.”
चला तर मंडळी जाणून घेऊया, एमेलिया करचा क्रिकेट प्रवास
क्रिकेटचा वारसा
एमेलियाचा जन्म १३ ऑक्टोबर २००० ला न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरात झाला. तिची आई जो व वडील रॉबी दोघेही वेलिंग्टनसाठी स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळले आहेत. तिचे आजोबा ब्रूस मरे यांनी न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले होते. तिची चुलत बहीण सिला डंकन न्यूझीलंडच्या महिला फुटबॉल संघात खेळते. एमेलियाची मोठी बहीण जेस ही देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. एकूणच खेळाची आवड असणाऱ्या व खेळाडूंच्या घराण्यात जन्म झाल्याने, क्रिकेटपटू होण्याचे तिने अगदी लहान वयातच नक्की केले.
सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण
वेलिंग्टनची असणारी, न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डिवाइन यांना आदर्श मानणाऱ्या एमेलियाने वयाच्या ८ व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. तिला सुरुवातीला वेगवान गोलंदाज व्हायची इच्छा होती. पण, तिचे प्रशिक्षक इवान तिसेरा यांना ती अधिक चांगली फलंदाज असल्याचे दिसल्याने व वेगवान गोलंदाजी केल्यास दुखापतीचा धोका उद्भवू शकतो म्हणून, तिला लेगस्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. लहानगी एमेलिया अगदी कमी वयात वेलिंग्टनमधील क्रिकेटची मैदाने गाजवत होती. एकोणीस वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा गाजवल्याने १६ वर्षाची होण्याआधीच तिला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात निवडले गेले. वयाची १७ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी, एमेलिया महिला विश्वचषक स्पर्धा खेळली होती. न्युझीलंड महिला संघाच्या वार्षिक करारात निवड झालेली ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती.
एकाच वनडेत नाबाद २३२ धावा आणि पाच बळी
आक्रमक फलंदाजी व लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या एमेलियाने १८ वर्ष पूर्ण करण्याआधी एक धमाकेदार विश्वविक्रम आपल्या नावे केला. १३ जून २०१८ ला डब्लिनच्या मैदानावर, आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने सलामीला फलंदाजी येत, ३१ चौकार व २ षटकारांसह १४५ चेंडूत नाबाद २३२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीसोबतच, सर्वात कमी वयात एकदिवसीय द्विशतक झळकावण्याचा मान देखील तिला मिळाला. याच सामन्यात तिने गोलंदाजीतही पाच बळी आपल्या नावे केले. एकाच सामन्यात २०० धावा व पाच बळी असा दुर्मिळ विक्रम तिच्या नावे जमा झाला आहे.
टी२० स्पेशालिस्ट
न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिलांच्या सुपर स्मॅश टी२० स्पर्धेत, एमेलिया व तिची मोठी बहीण वेगवान गोलंदाज जेस, वेलिंग्टन ब्लेझ संघासाठी खेळतात. एमेलिया न्यूझीलंड बाहेर व्यावसायिक लीग खेळण्यासाठी सर्वप्रथम इंग्लंडला गेली. २०१८ च्या किया सुपर लीग स्पर्धेत तिने सदर्न वायपर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१९ ला ती भारतात वुमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत, मिताली राजच्या नेतृत्वात वेलोसिटी संघाकडून खेळली. २०१९-२० वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
…म्हणून दिग्गज तिला ‘फ्युचर सुपरस्टार’ म्हणतात
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी२० विश्वचषकात न्यूझीलंडकडून सर्वाधिक प्रभावशाली खेळाडू देखील एमेलियाच ठरली. न्यूझीलंडच्या अनुभवी महिला क्रिकेटपटू सुझी बेट्स, सोफी डिवाइन तसेच ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग यांचे म्हणणे आहे की,
“एमीच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत खूप विविधता आहे. तिच्या स्वभावामुळे व मैदानावरील उपस्थितीमुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. पुढे एक आदर्श खेळाडू म्हणून ती आपले नाव उंचावेल.”
न्युझीलंड महिला संघाचा प्रशिक्षक असलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेकब ओराम एमेलियाविषयी सांगतो,
“२०१८ ला जेव्हा मी संघासोबत जोडला गेलो तेव्हा एमेलिया संघांत जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील होती. ती अत्यंत मेहनती खेळाडू आहे. आपल्या खेळाने तीने आदर कमावला आहे. वयाच्या पंचविशीपर्यंत ती न्युझीलंडची कर्णधार झालेली असेल. खेळाविषयीची आवड व जबाबदारी घेऊन खेळण्याची वृत्ती तिला महान खेळाडू बनवेल. ती एका पिढीत एकदाच जन्माला येणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.”
महिला क्रिकेटमधील नव्या दमाच्या क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या व महिला क्रिकेटला वलय मिळवून देणाऱ्या एमेलियाला ‘फ्युचर सुपस्टार’ का म्हणतात हे तिने आतापर्यंत तरी सिद्ध केले आहे.
वाचा-
-स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू
-एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’