---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने आता पुण्यात! BCCI कडून एमसीएवर सुपर लीग आणि अंतिम सामन्याची जबाबदारी

On: रविवार, डिसेंबर 7, 2025 8:56 PM
---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टी20 स्पर्धेपैकी एक असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayyed Mushtak Ali Trophy) सध्या ‘ग्रुप स्टेज’चे सामने सुरू आहेत. यानंतर 12 डिसेंबरपासून ‘सुपर लीग स्टेज’ची सुरुवात होणार आहे, तर 18 डिसेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना (Final) खेळला जाईल.

यादरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेच्या सुपर लीग स्टेज आणि अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामागील मुख्य कारण लॉजिस्टिक (खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची सोय) हे आहे.

बीसीसीआयने जेव्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले होते, तेव्हा ग्रुप स्टेजचे सामने लखनऊ, कोलकाता, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तर इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सुपर लीग स्टेज आणि अंतिम सामना आयोजित करण्यात येणार होता. आता बीसीसीआयने इंदूरच्या जागी पुण्यात सुपर लीग स्टेज आणि अंतिम सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ठिकाण बदलण्याबद्दल दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले की, आम्ही सुपर लीग आणि अंतिम सामन्याचे ठिकाण इंदूरवरून पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (MPCA) केलेल्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये ग्रुप स्टेजचे सामने संपल्यानंतर, प्रत्येक ग्रुपमधील पहिले दोन संघ सुपर लीग स्टेजमध्ये जातील. त्यांच्यात 12 डिसेंबरपासून सामने सुरू होतील, तर अंतिम सामना 18 डिसेंबरला होईल. पुण्यात हे सर्व सामने गहुंजे स्टेडियम आणि डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमी या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील.
यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्यापासून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीपर्यंत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत.

तत्पुर्वी पुण्यातील स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत , ही जबाबदारी बीसीसीआयने एमसीएला दिल्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.

एमसीएने म्हटले आहे की, बीसीसीआयने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 ची सुपर लीग आणि अंतिम सामना आयोजित करण्याची मोठी संधी दिली, त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मनापासून आभार मानत आहे.

पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गहुंजे आणि डी वाय पाटील अकादमी, आंबि येथे भारतातील उत्कृष्ट देशांतर्गत संघांचे स्वागत करणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. देशातील देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी बीसीसीआयने दाखवलेल्या सततच्या विश्वासाबद्दल आणि भक्कम पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. एमसीए स्पर्धात्मक आणि अविस्मरणीय स्पर्धेचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---