2019 च्या विश्वचषकाला आता फक्त एक वर्ष बाकी आहे. हा विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्स भूषवणार आहेत. 30 मे 2019 ला या विश्वचषकातील पहिला सामना खेळवला जाईल.
विश्वचषकात बऱ्याचदा उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीची चर्चा होत असते. पण यष्टीरक्षकाची कामगिरीची अशी चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या या टॉप 5 यष्टीरक्षकांचा आढावा
1. कुमार संगकारा: श्रीलंकेचा महान यष्टीरक्षक आणि खेळाडू कुमार संगकाराने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 4 विश्वचषक खेळले आहेत. यात त्याने 1.5 च्या प्रति डाव सरासरीनुसार 36 डावात 54 विकेट घतले आहेत.
संगकाराचे विश्वचषकातील पदार्पण न्यूझीलंड विरुद्ध 2003 मध्ये झाले. या विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यातच त्याला 3 झेल आणि 1 यष्टीचीत करण्यात यश आले. 2003च्या या विश्वचषकात संगकाराने यष्टीमागे एकूण 17 विकेट घेतल्या.
यानंतरच्या झालेल्या 2007च्या विश्वचषकात 15, 2011 च्या विश्वचषकात 14 तर 2015च्या विश्वचषकात 8 विकेट घेण्यात संगकाराला यश आले.
2015च्या विश्वचषकानंतर संगकाराने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विश्वचषकात एका डावात 4 विकेट घेण्याची संगकाराची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अशी कामगिरी त्याने 2003 मध्ये 2वेळा तर 2011मध्ये 1 वेळा असे विश्वचषकात एकूण 3 वेळा केली आहे.
2. अॅडम गिलख्रिस्ट: ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टची सर्वकालिन सर्वोत्तम यष्टीरक्षकांमध्ये गणती केली जाते.
आयसीसी विश्वचषकात यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये गिलख्रिस्ट दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 1999, 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात मिळून 1.677 च्या प्रति डाव सरासरीने 31 सामन्यात 52 विकेट घेतल्या आहेत.
याबरोबरच एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही गिलख्रिस्टच्या नावावर आहे. त्याने 2003 च्या विश्वचषकात फक्त 10 डावातच यष्टीमागे एकूण 21 विकेट घेतल्या होत्या.
तसेच एका डावात 6 विकेट घेण्याची गिलख्रिस्टची सर्वोत्तम कामगिरी आहे. ही कामगिरी त्याने 2003 मध्येच नांबिया विरुद्ध केली होती.
3. एमएस धोनी: भारताचा कॅप्टन कुल एमएस धोनी विश्वचषकात यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीला कायमच त्याच्या चपळ यष्टीरक्षणासाठी ओळखले जाते.
धोनीने आत्तापर्यंत 2007, 2011 आणि 2015 असे तीन विश्वचषक खेळले आहेत. या तीन विश्वचषकात मिळून त्याने 20 सामने खेळले असून यात त्याने 1.6 च्या प्रति डाव सरासरीने यष्टीमागे 32 विकेट घेतल्या आहेत.
तीन विश्वचषकांपैकी त्याने 2015 मध्ये सर्वाधिक 15 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वेगवान यष्टीचीत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने 2015 च्या विश्वचषकात 15 ही विकेट झेलच्या स्वरुपात घेतले.
याबरोबरच याच 2015 च्या विश्वचषकात त्याने एका डावात 4 विकेट घेत त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी केली. ही कामगिरी त्याने मेलबर्नला बांग्लादेशच्या विरुद्ध केली.
धोनी जर 2019 च्या विश्वचषकात खेळला तर त्याला यष्टीमागे आणखी विकेट घेण्याची संधी आहे.
3. ब्रेंडन मॅक्यूलम: न्यूझीलंडचा महान कर्णधार आणि खेळाडू ब्रेंडन मॅक्यूलम यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणाच्या यादीत एमएस धोनी बरोबर विभागुण तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानेही विश्वचषकात यष्टीमागे एकूण 32 विकेट घेतल्या आहेत.
मॅक्यूलमने जरी विश्वचषकात एकूण 34 सामने खेळले असले तरी त्याने 25 सामन्यातच यष्टीरक्षण केले आहे. या 25 सामन्यात त्याने 1.280 च्या प्रति डाव सरासरीने 32 विकेट घेतल्या आहेत.
त्याने खेळलल्या 2003, 2007, 2011 आणि 2015 या विश्वचषकांपैकी 2007 चा विश्वचषक त्याच्यासाठी यष्टीरक्षक म्हणून उत्तम ठरला. या विश्वचषकात त्याने 10 डावात 14 विकेट घेतल्या.
4. मार्क बाऊचर: अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा महान यष्टीरक्षक मार्क बाऊचरने विश्वचषकात एकूण 31 विकेट घेतले आहेत.
त्याने खेळलेल्या 1999,2003 आणि 2007 च्या विश्वचषकात मिळून 1.240च्या प्रति डाव सरासरीनुसार यष्टीमागे 31 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
बाऊचरसाठी 1999 चा पदार्पणाचा विश्वचषक सर्वोत्तम ठरला. त्याने या विश्वचषकात एकूण 11 विकेट घेतल्या. त्याचबरोबर या विश्वचषकात त्याने एका डावात 4 विकेट घेत विश्वचषकातील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली.
या चार विकेट त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामन्यात घेतल्या. हा सामना बरोबरीत सुटल्याने प्रसिद्ध झाला होता.
2003 च्या विश्वचषकातही यष्टीमागे बाऊचरने 11 विकेट घेतल्या. तर 2007 च्या विश्वचषकात बाऊचरला 9 विकेट घेण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना
–फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ