इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सध्या सुरू असतानाच शनिवारी चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडले आणि पुन्हा एकदा ही नेतृत्वाची जबाबदारी एमएस धोनीकडे सोपवली. खरंतर धोनी २००८ पासून चेन्नईचा कर्णधार होता पण त्याने २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्णधारपद सोडले होते आणि रविंद्र जडेजाला चेन्नईचा नवा कर्णधाक बनवण्यात आले होते. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चेन्नईने ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळवले. तसेच जडेजाची कामगिरीही फारशी बरी झाली नाही. अखेर जडेजाने आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चेन्नईचे कर्णधारपद सोडले.
पण, आता असा प्रश्न निर्माण झाला आहे की, जरी धोनीने (MS Dhoni) आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) उर्वरित सामन्यात चेन्नईचे नेतृत्व (CSK Captain) केले, तरी जर त्याने जर पुढच्या वर्षी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तर चेन्नईचे भविष्यात नेतृत्व करणार कोण? या लेखातूनही आपण अशा तीन खेळाडूंचा आढावा घेऊ जे चेन्नईने भविष्यात नेतृत्व करू शकतात.
३. दीपक चाहर
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ हंगामाच्या लिलावात सर्वाधिक बोली दीपक चाहरसाठी (Deepak Chahar) लावली. त्यांनी त्याच्यासाठी १४ कोटींहून अधिकची बोली लावली. दीपकनेही गेल्या ३ वर्षात अनेकदा चेन्नईला मोठे विजय मिळवून दिले आहे. मात्र, यावर्षी मोठी बोली लागली असली तरी, दीपक दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला. पण असे असले तरी, चेन्नई पुढील वर्षी नेतृत्वासाठी त्याच्यावर डाव लावू शकते. तो गोलंदाजीबरोबरच खालच्या फळीत फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. तो चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडूही आहे.
२. मोईन अली
इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) याला आयपीएल २०२२ साठी चेन्नईने संघात कायम केले होते. तसेच तो चेन्नई संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत २२१ टी२० सामने खेळले असून ४७५८ धावा आणि १४९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे टी२० क्रिकेटचा बराचसा अनुभव देखील आहे. त्यामुळे तो देखील चेन्नई सुपर किंग्ससाठी कर्णधार म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो.
१. ऋतुराज गायकवाड
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार होण्यासाठी सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad). २५ वर्षीय ऋतुराजने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याची आयपीएल व्यतिरिक्त इतर देशांतर्गत स्पर्धांमध्येही कामगिरी दमदार राहिली आहे. विशेष म्हणजे त्याचे धोनीनेही अनेकदा कौतुक केले आहे. त्याला चेन्नईने संघात कायमही केले आहे.
तसेच आयपीएलच्या १५ व्या हंगामात ऋतुराजची कामगिरी आत्तापर्यंत अपेक्षित अशी झाली नाही. तरी चेन्नईने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. अशा परिस्थितीत तो चेन्नईचा भविष्यातील कर्णधार बनू शकतो. तसेच त्याच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाचा अनुभव देखील आहे. तो सध्या महाराष्ट्र संघाचा नियमित कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नऊ पैकी ८ सामने जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी दूर आहे प्लेऑफ, जाणून घ्या गणिते
शमीच्या खिलाडूवृत्तीला सलाम! प्रतिस्पर्धी असूनही अर्धशतक ठोकल्यानंतर विराटला दिल्या शुभेच्छा