भारत आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर १२ ते २० मार्च या कालावधीत दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे सर्व सामने होणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने या मालिकेसाठी टी२० संघ घोषित केला आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत या दिग्गज खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या अनकॅप खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
यातील बरेच खेळाडू सध्या वेगवेगळ्या शहरांत चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये सहभागी झाले आहेत. त्यातही त्यांनी नुसता सहभाग घेतला नसून आपल्या संघासाठी ते आपले सर्वोत्कृष्ट देत धडाकेबाज कामगिरी करत आहेत. यामुळे भारतीय टी२० संघाच्या प्रशिक्षकांची आणि कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. कारण सर्वच खेळाडू दमदार फॉर्ममध्ये असल्याने कुणावर दुर्लक्ष करावे आणि कुणाला निवडावे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे.
आम्ही अशाच ३ खेळाडूंचा आढावा घेतला आहे, जे सध्या विजय हजारे ट्रॉफीत लक्षणीय कामगिरी करत असल्याने त्यांना टी२० संघात संधी दुर्लक्षित करून चालणार नाही.
सूर्यकुमार यादव
मागील कित्येक वर्षांपासून भारतीय संघाचे दार ठोठावत असलेल्या सूर्यकुमार यादवला अखेर टी२० संघात जागा मिळाली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीतील जबरदस्त फॉर्मसह आपल्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळण्याच्या शक्यता वाढवल्या आहेत. आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीत त्याने ४ सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतक केले आहे. पुदुच्चेरी संघाविरुद्ध १३३ धावा करत त्याने आपले शतक साजरे केले होते. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवणे कोहलीला खूप अवघड जाईल.
श्रेयस अय्यर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिकेत श्रेयस अय्यरचे संघातील स्थान पक्के नव्हते. त्याला ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील २ सामन्यातच अंतिम ११ जणांच्या जागा मिळाली होती. तर एका सामन्यात त्याच्याजागी मनिष पांडेला संधी देण्यात आली होती. परंतु विजय हजारे ट्रॉफीत हा फलंदाज कमालीचे प्रदर्शन करत आहे. त्याने सलग २ सामन्यात शतक झळकावले आहे. त्यामुळे टी२० मालिकेत त्याला संघाबाहेर ठेवणे चुकीचे ठरेल. अशात जर कोहलीने त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली, तर सूर्यकुमारचे स्थान धोक्यात येऊ शकते.
इशान किशन
यष्टीरक्षक फलंदाजाच्या रुपात टी२० मालिकेत कर्णधार कोहली रिषभ पंतला पहिली पसंती दर्शवेल. कारण तो चांगल्या लयीत आहे. सोबतच यष्टीरक्षण आणि फलंदाजी दोन्हीतही प्रशंसनीय कामगिरी करत आहे. दुसरीकडे इशान किशनने विजय हजारे ट्रॉफीत ९४ चेंडूत १७३ धावांची विस्फोटक खेळी केली आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या किशनलाही दुर्लक्षित करणे कोहलीला अवघड जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना भावा! उथप्पाची पुन्हा एकदा ताबडतोड फलंदाजी, १० षटकारांसह साजरे केले तुफानी अर्धशतक
चोप चोप चोपणार!! आगामी टी२० मालिकेत ‘हे’ भारतीय फलंदाज पाडणार धावांचा पाऊस