श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने आजवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. मुरलीधरन त्या गोलंदाजांपैकी एक होता, ज्यांची गोलंदाजी समजणे कोणत्याही फलंदाजाला कठीण जायचे. हा विक्रम मोडणे कदाचित फार कठीण आहे. मात्र, भविष्यात हा विक्रम काही मोजके गोलंदाज मोडू शकतील. त्यातील पाच गोलंदाजांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
१. जेम्स अँडरसन (James Anderson)
इंग्लंड संघाचा जलद गतीचा गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. जेम्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंड विरुद्ध ४ बळी आपल्या नावे केले आहेत. सध्या जेम्स ३९ वर्षांचा असून मुरलीधरनचा विक्रम मोडण्याच्या यादीत तो सध्या सर्वोच्च स्थानी आहे. जेम्सने आत्तापर्यंत १७० कसोटी सामन्यांत ६४५ बळी घेतले आहेत. जेम्स त्याच्या कारकीर्दीत आणखी काही काळ असाच चांगल्या फॉर्ममध्ये खेळत राहिल्यास तो मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतो.
२. आर अश्विन (R Ashwin)
भारतीय संघाचा फिरकीटू आर अश्विनदेखील मुरलीधरनचा विक्रम मोडू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अश्विन सुद्धा सध्या त्याच्या करदकिर्दीच्या उच्चांकावर खेळत आहे. आजवर त्याने ८६ कसोटी सामन्यांत ४४२ बळी घेतले आहेत. शिवाय अश्विनच्या गोलंदाजीची सरासरी २४.१३ इतकी आहे. म्हणजेच तो सरासरी २५व्या चेंडूवर बळी घेत असतो. त्यामुळे लवकरच तो देखील मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतो.
३. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)
इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने भलेही सुरुवातीच्या काळात खराब प्रदर्शन केले असले, तरी काळाप्रमाणे त्याने गोलंदाजीत सुधार केला आहे. त्याने आजवर खेळलेल्या १५३ कसोटी सामन्यांत ५३९ बळी घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात तो देखील मुरलीधरनचा विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतो.
४. अक्षर पटेल (Axar Patel)
भारतासाठी डावखुरा फिरकीपटू असणारा अक्षर पटेल केवळ २८ वर्षांचा आहे. त्याने नुकतीच त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. अक्षरने त्याच्या युवा कारकिर्दीत केवळ ६ कसोटी सामने खेळत ३९ बळी घेतले आहेत. शिवाय त्याची सरासरी १२.४४ इतकी आहे. याचाच अर्थ अक्षर सरासरी प्रत्येक १२ चेंडूंनंतर बळी घेतो. त्यामुळे भविष्यात अक्षर त्याच्या गोलंदाजीत सातत्य राखू शकल्यास तो देखील मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतो.
५. नेथन लायन (Nathan Lyon)
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथम लायन देखील बऱ्याच काळापासून सातत्याने ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी करत आहे. नेथनने आजवर खेळलेल्या १०८ कसोटी सामन्यांत ४२७ बळी घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेथनसुद्धा मुरलीधरनचा विक्रम मोडण्यास अग्रस्थानी दिसू शकेल.
दरम्यान, मुरलीधरन याने आपला शेवटचा कसोटी सामना २०१० साली खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत तब्बल १२ वर्षे उलटली असली, तरी मुरलीधरनचा विक्रम मोडण्यास कोणत्याही खेळाडूला यश आलेले नाही. त्यामुळे भविष्यात कोण हा विक्रम मोडू शकेल याची उत्सुकता लागलेली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तरीही कोहली फेल असल्यासारखे वाटते’, भारताच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
‘तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित केल्यावर दु:ख होते’, संघाची साथ सोडल्यानंतर हळहळला साहा