आजच्या दिवशी (05 नोव्हेंबर) एक वर्षापूर्वी, भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने विश्वचषकादरम्यान 49व्या वनडे शतकासह 35 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याने कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी केली होती. आता 5 नोव्हेंबर 2024 रोजी तो एक वर्षाने मोठा झाला आहे. दरम्यान आता कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कठीण बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे. बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर अपयशी ठरल्यानंतर विराटवर पुनरागमन करण्याचे दडपण आहे. आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. या बातमीद्वारे विराट कोहलीच्या अश्या 5 विक्रमांबद्दल बोलणार आहोत. जे मोडणे अशक्य आहे.
1. सर्वाधिक एकदिवसीय शतके
36 वर्षीय कोहलीने गेल्या वर्षी वर्ल्ड कपमध्ये 50 वनडे शतके झळकावणारा पहिला खेळाडू बनून इतिहास रचला होता. विराटने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. कोहलीला येत्या काही वर्षांत आणखी काही शतके झळकावायची संधी आहेत. त्याला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात आपली ताकद दाखवायची आहे. सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या यादीत पुढील सक्रिय क्रिकेटर रोहित शर्मा आहे. जो 31 शतकांसह कोहलीच्या 19 शतकांनी मागे आहे.
2. एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या हंगामात कोहलीने संस्मरणीय फलंदाजी केली होती. ज्यात त्याने अनेक विक्रम केले. विराटसाठी ही खास स्पर्धा होती. त्याने 11 सामन्यात 765 धावा करून एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्याने भारताला अंतिम फेरीत नेण्यात उत्कृष्ट भूमिका बजावली. परंतु अंतिम फेरी जिंकता आली नाही. 765 धावांसह, त्याने 2003 च्या आवृत्तीत तेंडुलकरचा 673 धावांचा विक्रम मोडला.
3. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा
विराटने आयपीएलमध्येही वर्चस्व गाजवले आहे. 2016 हा त्याच्यासाठी ऐतिहासिक हंगाम होता. ज्यात त्याने 973 धावा केल्या होत्या. स्पर्धेच्या एका आवृत्तीत ही सर्वाधिक धावा आहेत. शुबमन गिल हा एकमेव फलंदाज होता. जो 2023 मध्ये 890 धावा करून हा विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता. कोहलीशिवाय या स्पर्धेत एकाही फलंदाजाला 900 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
4. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक एकदिवसीय शतके
कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘चेस मास्टर’ हा किताब पटकावला आहे. धावांचा पाठलाग करताना 27 शतके झळकावून हा स्टार फलंदाज 50 षटकांच्या फॉरमॅटमधील सर्वोत्तम धावांचा पाठलाग करणारा खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या डावात शतक झळकावण्याच्या बाबतीत कोहलीच्या जवळपास कोणीही नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन आहे. ज्याने 17 शतके झळकावली आहेत.
5. सर्वाधिक मालिकावीर खेळाडू पुरस्कार
36 वर्षीय विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. कोहलीने 21 ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार जिंकले आहेत. एकदिवसीयमध्ये 11, कसोटीमध्ये 3 आणि टी-20मध्ये 7 म्हणजे त्याच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक पटकावले आहेत. सचिनला (20) मागे टाकून त्याने ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा-
रोहित शर्मानंतर कसोटीत कर्णधार कोण? दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक अंदाज!
रिषभ पंत आणि आर अश्विनला विकत घेण्यासाठी सीएसके कोट्यवधी खर्च करायला तयार!
भारतीय संघाचे WTC फायनल खेळण्याचे स्वप्न भंगणार? अंतिम सामन्याचा मार्ग खडतर