जगभरात वेगवेगळ्या टी२० लीग खेळल्या जातात. बरेच परदेशी खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसतात. मात्र इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मेगा लिलावात काही खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. यामध्ये भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी (Hanuma Vihari) याचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अभिमन्यू ईश्वरन, परवेज रसूल, बाबा अपराजित, अशोक मेनारिया, चिराग जानी आणि गुरिंदर सिंग या भारतीय खेळाडूंवरही बोली लागल्या नव्हत्या. आता या ७ क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळाल्याने बांगलादेशच्या ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला ढाका प्रीमियर लीगमधील फ्रँचायझींशी करारही केला असल्याचे समजत आहे.
डीपीएलमध्ये खेळण्यासाठी घेणार ब्रेक
क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, विहारी ढाका येथे जाण्यासाठी छोटा ब्रेक घेणार आहे. तत्पूर्वी तो हैदराबादला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हैदराबादवरून तो ढाका प्रीमियर लीग (डीपीएल, Dhaka Premiere League) मधील अबहानी लिमिटेड संघासोबत जोडला जाईल. परंतु तो डीपीएलमधील सुरुवातीच्या ३ सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याजागी अफगाणिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाज नजीबुल्लाह जादरान याला सहभागी केले गेले आहे.
या संघांचा भाग असतील इतर खेळाडू
बंगाल रणजी संघाचा कर्णधार आणि भारतासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरन याला डीपीएलमधील प्राइम बँक संघाने विकत घेतले आहे. तर परवेज रसूल शेख जमाल धनमंडी, बाबा अपराजित रूपगंज टायगर्स, अशोत मेनारिया खेलघर, चिराग जानी लीजेंड्स ऑफ रुपगंज आणि गरुंदिर सिंग गाजी ग्रुप ऑफ क्रिकेटर्सकडून खेळताना दिसेल.
महत्त्वाचे म्हणजे, भारतीय क्रिकेटपटूंनी डीपीएलमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कोविड-१९ मध्ये स्थगित झालेल्या डीपीएलचा विहारी, ईश्वरन, अपराजित, मेनारिया आणि रसूल भाग होते. तसेच दिनेश कार्तिक, मनोज तिवारी आणि यूसुफ पठाणसारखे खेळाडूही डीपीएलमध्ये खेळले आहेत.
श्रीलंकेचा भाग होता विहारी
नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत हनुमा विहारी भारतीय संघाचा भाग होता. तो या मालिकेदरम्यान संघासाठी संकटमोचक राहिला आहे. त्याने या मालिकेतील ३ डावांमध्ये ४१.३३ च्या सरासरीने १२४ धावा केल्या आहेत. त्याला चेतेश्वर पुजाराच्या जागी कसोटी संघात सहभागी केले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुल सर्वात महागडा, तर डू प्लेसिस स्वस्त कर्णधार! पाहा आयपीएल २०२२ मधील सर्व कर्णधारांची कमाई
बंगळुरू कसोटीत ‘सामनावीर’ बनलेल्या श्रेयसने सांगितली मनातली गोष्ट, झोपेतही पाहायचा टेस्टचे स्वप्न
टिक टिक बुम! रोहित आणि बुमराह पोहोचले मुंबईत, ‘पलटण’ने शेअर केला झक्कास व्हिडिओ