आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. यामध्ये बरेचसे आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले होते. काही युवा खेळाडूंना विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. तर युझवेंद्र चहल, शिखर धवनसारख्या अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले नाहीये. या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात ७ असे खेळाडू आहेत, जे पहिल्यांदा टी -२० विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. चला तर जाणून घेऊया, कोण आहेत ते खेळाडू?
१) सूर्यकुमार यादव – आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याला इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तसेच सूर्यकुमार यादवची टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला ५ व्या क्रमांकांवर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
२) ईशान किशन – भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत तुफानी अर्धशतक झळकावले होते. ईशान किशनने इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जेव्हा तो १२ वर्षांचा होता. त्यावेळी क्रिकेट खेळण्यासाठी त्याला रांचीमध्ये स्थलांतरित व्हावे लागले होते. त्यावेळी त्याची स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या संघात निवड झाली होती. त्यावेळी राहण्यासाठी त्याला एक छोटी खोली देण्यात आली होती. ज्यामध्ये ईशान किशन व्यतिरिक्त आणखी ४ खेळाडू राहत होते. ईशान किशनला जेवण बनवता येत नव्हते, ज्यामुळे त्याला भांडी घासणे आणि पाणी भरण्यासारखे काम करावे लागायचे. अनेकदा तर त्याला जेवण न करता झोपावे लागायचे.
३) वरूण चक्रवर्ती – भारतीय संघाचा मिस्ट्री गोलंदाज वरूण चक्रवर्ती देखील पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याची खासियत म्हणजे, तो ७ वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्यामुळे तो विरोधी संघातील फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याला २ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर २८ आयपीएल सामन्यात त्याने ३४ गडी बाद केले आहेत.
४) राहुल चाहर – भारतीय संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहर देखील पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याने नुकताच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेल्या टी -२० मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. तसेच त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ७ गडी बाद करण्यात यश आले आहे.
५) अक्षर पटेल – अक्षर पटेलला संघात स्थान मिळाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु यूएईमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. तसेच तो फलंदाजी देखील करू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून अक्षर पटेलला या संघात स्थान देण्यात आले आहे.
६) रिषभ पंत – भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने अनेकदा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. तो आगामी विश्वचषक स्पर्धेत यष्टिरक्षण करताना दिसून येऊ शकतो. रिषभ पंतने यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु टी -२० विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
७) केएल राहुल – भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज केएल राहुलला देखील पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. तो आगामी विश्वचषक स्पर्धेत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. शिखर धवनला संघाबाहेर करून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. केएल राहुलने देखील २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यापूर्वी ‘या’ अष्टपैलूने सोडली आरसीबीची साथ, मोठ्या कारणामुळे परतला मायदेशी