आगामी टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला गेला आहे, पण त्यातील तीन खेळाडू सध्या खराब फार्ममध्ये दिसत आहेत. संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या तिघांना सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत काही कमाल करता आलली नाही. त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांचे आयपीएलमधील संघही अडचणीत आले आहेत.
सूर्यकुमार आणि इशान किशन प्रतिनिधित्व करत असलेला आणि पाच वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकलेला मुंबई इंडियन्स यावर्षी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष करत आहे. तसेच भुवनेश्वरचा सनरायझर्स हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे या खेळाडूंऐवजी दुसऱ्या खेळाडूंना टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते.
१० ऑक्टोबरपूर्वी भारतीय संघात होऊ शकतो बदल
आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ १० ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या संघात बदल करू शकतात. त्यामुळे बीसीसीआय या तिघांच्या संघातील स्थानावर विचार करू शकते. त्यांच्या ऐवजी श्रेयस अय्यर आणि टी नटराजन यांच्यासारख्या खेळाडूंच्या नावावर चर्चा होऊ शकते. बीसीसीआयकडून याबाबत कसलीही माहिती दिली गेली नसली तरी, पुढच्या एका आठवड्यातील या खेळाडूंचे प्रदर्शन पाहून निवडकर्ते संघात बदल करू शकतात.
सूर्यकुमारची जागा घेऊ शकतो श्रेयस अय्यर
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर उत्कृष्ट प्रदर्शन केलेला सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये अपयशी ठरत आहे. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील चार सामन्यात सूर्यकुमारने ०, ८, ५ आणि ३ अशी खराब खेळी केली आहे. विश्वचषकासाठी सूर्यकुमारला भारतीय संघात संधी देण्यासाठी निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे. निवडकर्त्यांनी जर विश्वचषकापूर्वी संघात बदल केला तर श्रेयस अय्यरला संधी मिळणे निश्चित मानले जात आहे.
ईशान किशनच्या जागी धवन किंवा सॅमसनला मिळू शकते संधी
ईशान किशन मागच्या बऱ्याच दिवसांपासून खराब फार्ममध्ये आहे. तो श्रीलंका दौऱ्यावरही काही खास प्रदर्शन करू शकला नव्हता. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही तो मुंबई इंडियन्ससाठी काही खास कामगिरी करू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर निवडकर्ते विश्वचषकात त्याच्या जागी शिखर धवन किंवा संजू सॅमसन यांच्या नावावर विचार करू शकतात. या दोघांनी आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
जर धवनला संघात सामील केले तर रिषभ पंत व्यतिरिक्त राहुल संघाचा दुसरा यष्टीरक्षक असेल. तसेच सॅमसनला संघात सामील केले तर तो स्वत: यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडू शकतो.
भुवनेश्वरच्या जागी टी नटराजनला मिळू शकते संधी
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही सध्या खराब फार्ममध्ये आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा वेग फारच कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे फलंदाजांना त्याचा स्विंग किंवा संथ गतीने टाकलेला चेंडू खेळण्यात काहीच अडचण येत नाहीय.
विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांच्यातील सर्वात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर आहे. अशात संघात बदल करायचा झाल्यास त्याच्या जागी टी नटराजन किंवा खलील अहमद यांच्या नावावर विचार केला जाऊ शकतो. यामुळे भारतीय संघात एक डाव्या हाताचा वेगवान गोलंदाजही सामील होईल आणि गोलंदाजी आक्रमणात विविधता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘क्रिकेटर कम मेंटॉर’, सामना विजयानंतर राजस्थानच्या युवा ब्रिगेडला कोहलीकडून मोलाचे मार्गदर्शन-VIDEO
रहाणे, पुजाराने कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत केली तक्रार? बीसीसीआयची याप्रकरणी आली ‘पहिली’ प्रतिक्रिया
खेळ भावनेवरुन खरीखोटी ऐकवणाऱ्या मॉर्गनला अश्विनचे तिखट प्रत्युत्तर, समजावली व्याख्या