ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या ऍशेस मालिका २०२१ (Ashes Series 2021) चा निकाल यजमानांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. ब्रिसबेन येथील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाहुण्या इंग्लंडवर ९ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर ऍडलेड येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाने २७५ धावांनी बाजी मारली आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा लागली आहे.
इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१०-११ मध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी उभय संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ज्यामध्ये इंग्लंडने ३-१ अशी बाजी मारली होती. त्यानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळताना विजय मिळवण्यात अपयश आले आहे. तसेच त्यांना त्यानंतर ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामनादेखील जिंकता आलेला नाही.
२०११ नंतर २०१३-१४ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात कसोटी खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी इंग्लंडला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ५-० असा व्हाईटवॉश दिला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये इंग्लंडचा संघ ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. यावेळी ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील १ सामना अनिर्णित राखण्यात त्यांना यश आले होते. परंतु उर्वरित चारही सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता.
यानंतर यंदाही ऍशेस मालिकेतील पहिल्या २ सामन्यातही इंग्लंडचा पराभवच झाला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा इंग्लंडने ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी विजय मिळवलेला तेव्हापासून जगात बरेच बदल झाले आहेत. (Changes In World)
जेव्हा इंग्लंडने ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी विजय (England Last Test Win In Australia) मिळवला होता, तेव्हा डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स, जो रूट, विराट कोहली अशा कसोटीतील मातब्बर खेळाडूंनी त्यावेळी कसोटीतील पदार्पणही केले नव्हते. परंतु आता हे खेळाडू कसोटीतील दिग्गज म्हणून ओळखले जातात. तर स्टिव्ह स्मिथ त्यावेळी खालच्या फळीत फलंदाजी करत होता. परंतु आता तो मधल्या फळीत खेळताना दिसतो. तसेच पाकिस्तानचा बाबर आझम हा त्यावेळी १९ वर्षांखालील क्रिकेट सामने खेळत होता. पण आता तिन्ही स्वरुपात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे.
फक्त क्रिकेटविश्वातच नव्हे तर, इतर क्षेत्रातही बऱ्याच गोष्टी घडल्या नव्हत्या. जसे की, त्यावेळी नोवाक जोकोविच या टेनिसपटूने एकही विंबलडन जिंकले नव्हते. अशाप्रकारे जेव्हा शेवटच्या वेळी इंग्लडने ऑस्ट्रेलियात विजय मिळवलेला तेव्हापासून जगात बरेच बदल झाले आहेत.
आता इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात कधी विजयाचे खाते उघडतो आणि त्यांची ही ऑस्ट्रेलियातील पराभवाची नकोशी मालिका खंडित करतो, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजाने सांगितले आयपीएलमध्ये जास्त भारतीय प्रशिक्षक नसण्याचे कारण; म्हणाला…
कशी असणार पहिल्या कसोटीत भारतीय ‘प्लेइंग इलेव्हन’? युवा जोश की अनुभवाला मिळणार प्राधान्य?
सीएसकेने ट्रायलसाठी बोलावलेला ‘हा’ खेळाडू नक्की आहे तरी कोण?