बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसरकर कसोटी मालिकेचा दुसरा कसोटी सामना शनिवारपासून (२६ डिसेंबर) सुरु झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या या सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना असेही म्हटले जात आहे. नाताळ सणाचा दुसरा दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी मेलबर्न येथे या कसोटी सामन्याची सुरुवात होते त्यामुळे या सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून संबोधले जाते.
बॉक्सिंग डे कसोटीतून पदार्पण करणारे भारतीय खेळाडू
या ऐतिहासिक सामन्यातून युवा भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांनी शनिवारी(२६ डिसेंबर) कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. यासह मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या भारतीयांच्या मांदियाळीत त्यांचा समावेश झाला आहे. सिराज आणि गिलपुर्वी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल, मयंक अगरवाल आणि माजी भारतीय क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकर यांनी ‘बॉक्सिंग डे’ सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
अगरवालने २०१८ साली, केएल राहुलने २०१४ साली आणि कानिटकर यांनी १९९९ साली बॉक्सिंग डे कसोटीतून पदार्पण केले होते.
मायदेशात एकाच सामन्यातून कसोटी पदार्पण करणारे दोन भारतीय
याचबरोबर सिराज आणि गिलप्रमाणे एकाच सामन्यातून दोन भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी २०१३ साली रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. नोव्हेंबर महिन्यात भारताच्या कोलकाता शहरातील ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना झाला होता.
मायदेशाबाहेर एकाच सामन्यातून कसोटी पदार्पण करणारे तीन भारतीय
तसेच जून २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून एक-दोन नव्हे तर तीन भारतीय फलंदाजांनी पदार्पण केले होते. यात विराट कोहली, अभिनव मुकुंद आणि प्रविण कुमार यांचा समावेश होता. मात्र हा कसोटी सामना भारताबाहेर वेस्ट इंडिजच्या सबीना पार्क मैदानावर झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
पदार्पण वीरांची चपळाई कांगारूंवर पडली भारी, सिराज-गिल जोडीच्या ‘त्या’ एका विकेटने ऑसींचा डाव गडगडला
IND vs AUS: पदार्पणातच सिराजची हवा; लॅब्यूशानेनंतर ‘या’ ऑसी फलंदाजाला धाडलं तंबूत