शनिवारी (५ फेब्रुवारी) १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. यावर्षीचा १९ वर्षाखालील विश्वचषक वेस्ट इंडीजमध्ये खेळला गेला. यश धूलच्या (yash dhull) नेतृत्वातील भारताच्या १९ वर्षाखालील संघाने इतिहासातील ५ वा विश्वचषक जिंकला. यावर्षीच्या विश्वचषकात अनेक खेळाडूंनी नेत्रदीपक प्रदर्शन केले. यामध्ये भारताच्या राज बावाचाही समावेश आहे. भारताच्या इतरही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले.
दक्षिण अफ्रिकेचा युवा अष्टपैलू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शन केले. ब्रेविसला या प्रदर्शनासाठी स्पर्धा संपल्यानंतर मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. ब्रेविसचे प्रदर्शन जरी अप्रतिम असले, तरी त्याचा दक्षिण अफ्रिका संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर राहीला. ब्रेविसने या विश्वचषकात दक्षिण अफ्रिकेसाठी ८४.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने ५०६ धावा साकारल्या.
भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू राज बावाने (raj bawa) अंतिम सामन्यात संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले आणि इंग्लंडला धूळ चारली. भारताने अंतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी केली आणि बावाने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. बावाने या सामन्यात ९.५ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ३१ धावा खर्च करून पाच महत्वाच्या विकेट्स घेतल्या. बावाच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंड संघ स्वस्तात सर्वबाद झाला आणि भारताने लक्ष्य सहज गाठले. या प्रदर्शनासाठी बावाला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. सोबतच बावा स्पर्धेत सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याने युगांडाविरुद्धच्या सामन्यात १०८ चेंडूत नाबाद १६२ धावा केल्या होत्या.
श्रीलंकेच्या १९ वर्षाखालील संघाच कर्णधार दुनिथ वेललागे (Dunith Wellalage) याचे प्रदर्शनही अप्रतिम राहिले. दुनिथ एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. त्याने यावर्षी खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. स्पर्धेत त्याने १३.५८ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शनाचा विचार केला, तर स्कॉटलंडच्या जेमी कर्न्सने (Jamie Cairns) ही कामगिरी केली आहे. स्कॉटलंड आणि युगांडामध्ये झालेल्या सामन्यात त्याने २४ धावा खर्च करून युगांडाच्या ६ खेळाडूंना तंबूत पाठवले होते.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: रिव्ह्यू घेण्यातही कॅप्टन रोहित हिट! चलाखीने दाखवला ब्रावोला तंबूचा रस्ता
‘लेगस्पिन ग्रँडमास्टर’ चहलने घातली नव्या विक्रमाला गवसणी
टीम इंडियाचा १००० वा वनडे! वाचा जलद शतक ते सर्वोत्तम गोलंदाजी पर्यंतची वनडे इतिहासातील खास आकडेवारी