इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. हा आयपीएलचा १९ वा हंगाम आहे. २०२५ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करत पहिल्यांदा विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली होती. आयपीएलच्या इतिहासात अनेक चकित करणारे विक्रम झाले आणि मोडलेही गेले आहेत. तरीही असे काही विक्रम जे आतापर्यंत झाले नाही, ते कोणते ते जाणून घेऊ.
ऑरेंज कॅप – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. आजपर्यंत कोणत्याही सलामीवीर नसलेल्या खेळाडूने ऑरेंज कॅप जिंकलेली नाही. आयपीएलची सुरूवात २००८ मध्ये झाली तेव्हापासून ते २०२५ पर्यंत ऑरेंज कॅप जिंकणारे १४ वेगवेगळे खेळाडू सलामीवीर फलंदाज होते.
३०० धावसंख्या – आयपीएलमध्ये अद्याप एकाही संघाने ३०० धावा केल्या नाहीत. सनरायझर्स हैद्राबादने २०२४ मध्ये आरसीबीविरुद्ध ३ विकेट्स गमावत २८७ धावा केल्या होत्या. ही या लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच हैद्राबादने २०२५ च्या हंगामात २८६ आणि २७८ धावसंख्याही केल्या आहेत.
भारतीय फलंदाज वैयक्तिक १५० पेक्षा अधिक धावा करण्यात अपयशी – आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजीने सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. त्याने सनरायझर्स हैद्राबादकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्ध १४१ धावांची खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांचा विक्रम क्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज गेलने २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा केल्या होत्या. तसेच २००८ मध्ये न्यूझीलंडचा माजी विकेटकीपर-फलंदाज मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आरसीबीविरुद्ध १५८ धावा (७३ चेंडू) केल्या होत्या.
रोहित शर्मा आणि ६०० धावा – मुंबई इंडियन्सने आयपीएलचे ५ विजेतेपद जिंकले आहेत आणि त्यामध्ये रोहित शर्मा यानेच संघाचे नेतृत्व केले होते. हिटमॅन या टोपननावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहितने आयपीएलमध्ये केवळ एकदाच ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याने २०२३ च्या हंगामात ५३८ धावा केल्या होत्या.
फेयर प्ले अवॉर्ड – आरसीबीला आतापर्यंत एकदाही फेयर प्लेचा पुरस्कार मिळाला नाही. हा पुरस्कार अशा संघाला दिला जातो, जो त्या संपूर्ण हंगामात मैदानावर शिस्तबद्ध वर्तन करतो, पंचांच्या निर्णयांचा आदर करतो आणि सर्व नियमांचे पालन करतो.




