प्रो कबड्डीमध्ये काही नवीन खेळाडूंनी नाव कमावले आहे. तर काही खेळाडूंना त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे. प्रो कबड्डीच्या मागील मोसमापर्यंतचे हे सुपरस्टार या मोसमामध्ये सुपर फ्लॉप ठरत आहेत. त्यापैकी काही खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू.
#१ काशीलिंग आडके– मागील मोसमापर्यंत प्रो कबड्डीमधील राहुल चौधरी नंतर दुसरा सर्वात यशस्वी रेडर काशीलिंग या मोसमामामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. मागील मोसमापर्यंत त्याने ५२ सामन्यात ४०६ गुण मिळवले होते. त्यातील ३८० त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. एक सामन्यात सर्वाधिक २४ गुण मिळण्याच्या विक्रम देखील त्याच्यानावावर आहे. परंतु या मोसमामध्ये त्याला महाराष्ट्रातील संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळून देखील चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने या मोसमात ४ सामने खेळताना १३ गुण मिळवले आहेत. त्यातील ११ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत. त्यापैकी ७ गुण त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मिळवले होते. म्हणजे बाकीच्या तीन सामन्यात त्याला रेडींगमध्ये फक्त ४ गुण मिळवता आले आहेत. अशी कामगिरी काशी सारख्या खेळाडूला न शोभणारी आहे.
#२ राकेश कुमार – तेलुगू टायटन्सच्या या खेळाडूला कबड्डीमधील सचिन तेंडुलकर म्हणले जाते. राकेश कुमार पहिल्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू होता. पहिल्या मोसमात उत्तम कामगिरी केल्यानंतर त्याला दुसऱ्या मोसमात उत्तम कामगिरी करता आली नाही. पटणा संघाने त्याला रिटेन केले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या मोसमामामध्ये या खेळाडूने यु मुंबा साठी खेळताना खूप चांगली कामगिरी केली. पण या मोसमामध्ये टायटन्ससाठी खेळताना राकेशला उत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्याने खेळलेल्या ८ सामन्यात २१ गुण मिळवले आहेत. त्यातील फक्त ६ रेडींग गुण आहेत तर १५ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. त्याच्या अनुभवाचा देखील तेलुगू संघाला फायदा झाला नाही. या मोसमात खेळलेल्या ८ सामन्यात तेलगू संघ ६ वेळा पराजित झाला आहे. एका सामन्यात विजय आणि एक सामना बरोबरीत राखण्यात या संघाला यश आले.
#३ शब्बीर बापू– हा एकमेव असा खेळाडू आहे जो प्रो कबडीच्या चारही मोसमामध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या संघाचा खेळाडू होता. २०१५ च्या अंतिम सामन्यात सुपर रेड करत यु मुंबाच्या विजयाचा पाय रचणारा हा खेळाडू या मोसमामध्ये थोडाही लयीत खेळताना दिसत नाही. या मोसमात खेळताना त्याने ४ सामन्यात १० गुण मिळवले आहेत. त्यातील ८ गुण रेडींगमधील आहेत. बाकीचे दोन गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत.
#४ जसवीर सिंग– या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या या खेळाडूला या मोसमामध्ये छाप पाडता आलेली नाही. पहिल्या मोसमात जयपुरला विजेतेपद मिळवून देण्यात खूप मोठी कामगिरी या खेळाडूने केली होती. मागील मोसमामध्ये देखील जयपुरच्या संघाला अंतीम फेरीत पोहचवण्यात या खेळाडूचा खूप मोठा वाटा होता. या मोसमामध्ये त्याने खेळलेल्या ३ सामन्यात त्याला केवळ ११ गुण मिळवता आले आहेत. त्याने पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी ५-५ गुण मिळवले होते. शेवटच्या सामन्यात त्याला फक्त १ गुण मिळवता आला होता. त्याच्या या कामगिरीमुळे जयपुरने तीन सामने खेळताना फक्त १ विजय मिळवला आहे. जसवीरला त्या सामन्यात फक्त ५ गुण मिळवता आले होते.
#५ सुकेश हेगडे– गुजरात फॉरचूनजायन्टसचा कर्णधार सुकेश हेगडे या मोसमामध्ये रेडींगमध्ये फ्लॉप ठरला आहे. पहिले चार मोसम तो तेलुगू टायटन्सचा अविभाज्य घटक होता. पहिल्या तीन मोसमात राहुल चौधरीच्या खांद्याला खांदा लावून तो गुण मिळवत होता. चौथ्या मोसमात देखील सुकेश चांगली कामगिरी करू शकला नव्हता. या मोसमात त्याच्या संघाने घरच्या मैदानावरील सगळे सामने जिंकले आहेत. परंतु सुकेशची रेडर म्हणून कामगिरी खूप खराब झाली आहे. त्याने खेळलेल्या ७ सामन्यात जवळजवळ ९४ रेड्स करताना त्याला फक्त १९ गुण मिळवता आले आहेत.